Coronavirus: अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं; नाव न घेता भाजपा नेत्यांचा घेतला समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 05:58 PM2020-04-11T17:58:35+5:302020-04-11T18:00:43+5:30
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी साधलेल्या संवादात भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचं संकट उभं राहिलं असताना जितेंद्र आव्हाड असो वा वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची मिळालेली परवानगी या मुद्द्यावरुन राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधी पक्ष भाजपाने या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही विरोधक निशाणा साधत आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधक भाजपाला नाव न घेता टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी साधलेल्या संवादात भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, काही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी थेट मुख्यमंत्री म्हणून जनतेशी संवाद साधणे मला योग्य वाटलं. देशभरात वेगवेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. पण प्रत्येक जण राजकारण बाजूला ठेऊन या संकटाशी सामना करत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र येऊन काम करतंय. अत्यंत चांगल्या पद्धतीने काम सुरु आहे. त्यामुळे यात वितुष्ट नको, पक्षीय राजकारण थांबली पाहिजेत. राजकारण आपल्या पाचवीला पुजली आहेत. पक्षीय राजकारण बाजूला ठेवा असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.
तसेच पंतप्रधानांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्स नरेंद्र मोदींसह सर्व मुख्यमंत्री तोंडावर मास्क लावलेले होते. हे चित्र फार विचित्र होतं. आजपर्यंत कोणीही आमच्या तोंडावर पट्ट्या बांधल्या नव्हत्या. आमचं तोंड बंद करण्याची हिंमत केली नाही पण एका विषाणूने आज हे चित्र पाहायला मिळालं. आम्ही सुद्धा जबाबदारी घेत आहोत. या वातावरणात राजकारण करु नका, प्रत्येकाने एकजूट कायम ठेवली तर आपला देश कोरोनाच्या संकटावर मात करेल पण भारत हा जगातील महासत्ता देश बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून एका युवकाला मारहाण केल्याप्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनाम्याची मागणी आणि घोटाळ्यातील आरोपीला महाबळेश्वरला जाण्यासाठी राज्याच्या गृहमंत्रालयाकडून मिळालेली शिफारस पत्र यावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा विरोधकांनी मागितला आहे. शरद पवारांच्या सांगण्यावरुन हे पत्र दिल्याचा दावा किरिट सोमय्या करत आहेत. या दोन्ही मुद्द्यावरून विरोधक राज्य सरकारवर विविध आरोप करत आहेत. त्यामुळे या दोन्ही घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.
राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवलं
१४ एप्रिलनंतर कुठेही मला गोंधळ नको, या संकटाचा सामना महाराष्ट्र ध्येर्याने करत आहे. या संकटात देशाला आणि जगाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राला करायचं आहे. हा लॉकडाऊन कधीपर्यंत संपेल हे जनतेच्या हातात आहे. आपणचं कोरोना संक्रमित साखळदंड तोडला तर लॉकडाऊन लवकरच संपेल. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहील शेतीच्या कामावर कोणतंही लॉकडाऊन आणलं नाही, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच राहील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.