Join us

Coronavirus: घाबरू नका! कोरोना बरा होतो; उपचारांनंतर डॉक्टर पुन्हा रुग्णसेवेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 2:40 AM

दवाखाने बंद ठेवणाऱ्यांना धडा

मुंबई : कोरोनाच्या दहशतीमुळे असंख्य खासगी डॉक्टरनी आपले दवाखाने आणि रुग्णालयांना टाळे ठोकले आहे. मात्र, कोरोनावर मात करणाºया ठाण्यातील डॉक्टर रमेश गौतम (नाव बदलले आहे) यांनी रुग्णसेवेसाठी आपला दवाखाना आणि रुग्णालय पुन्हा सुरू करत एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

ठाण्यातील रामचंद्रनगर परिसरात डॉक्टर रमेश यांचा एक दवाखाना आणि १५ बेडचे रुग्णालय आहे. दैनंदिन व्यवहार आणि रुग्णसेवा करताना कधी कोरोनाची लागण झाली तेच त्यांना कळले नाही. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर घराजवळ अ‍ॅम्ब्युलन्स धडकली. कस्तुरबा हॉस्पिटलला जागा नव्हती. फोर्टीस आणि कळवा रुग्णालयाने गंभीर लक्षणे नसल्याने दाखल करून घेतले नाही. सुरुवातीला होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देणाºया पालिकेने रमेश यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांनंतर अंगदुखीचा त्रास होत असलेल्या पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने त्यांना मोठा हादरा बसला. १० वर्षांच्या मुलाला बाधा झाली नाही हे त्यांचे सुदैवच.

खासगी रुग्णालयात आठ ते दहा दिवसांच्या उपचारांनंतर हे दांपत्य कोरोनामुक्त झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार त्यांनी १४ दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. आता कोणतीही भीती न बाळगता त्यांनी स्वत:ला पुन्हा रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यासाठी रीतसर परवानगी आणि दवाखान्यासह रुग्णालय सॅनिटाइझ केले आहे. शुक्रवारी दवाखान्यात गेल्यानंतर नियमित उपचारांसाठी येणाºया रुग्णांनीच टाळ्यांच्या गजर आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केल्याने त्यांचे डोळे पाणावले होते. चीन आणि कोरियातील रुग्णांना पुन्हा कोरोना झालाय़ मात्र, या कठीण काळात रुग्णसेवा करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे न डगमगता काम सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.मुलगा धाय मोकलून रडलाआम्हा पती-पत्नीला कोरोनाची लागण झाल्यामुळे १० वर्षांच्या मुलाला कुणाकडे ठेवायचे, हा प्रश्न होता. लॉकडाउनमुळे माझ्या आईला ठाण्यात घेऊन येणे शक्य नव्हते. बायकोच्या आईचे वय ६५ वर्षे असल्याने त्यांच्यावर निर्बंध होते. मेव्हणीचा मुलगा पाच वर्षांचा होता. त्याला धोका असल्याने बरोबर ठेवणे शक्य नव्हते. परंतु, मेव्हणीने आपल्या लहानग्याला नातेवाइकांकडे ठेवून माझ्या मुलाचा दहा दिवस सांभाळ केला. तो काळ मुलगा आणि आमच्या दोघांसाठी प्रचंड तणावाचा होता. त्यामुळेच पुन्हा रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मुलाने माझे पाय पकडले आणि तो धाय मोकलून रडत होता, असेही रमेश यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या