Coronavirus: लोकल, मेट्रोचा प्रवास नको रे बाबा; कोरोनाची लागण होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 04:17 AM2020-06-30T04:17:01+5:302020-06-30T04:17:24+5:30
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी फक्त १५ टक्के जणांनी जिम आणि स्वीमिंग पूलचा वापर करू, असे मत नोंदविले आहे. ८५ टक्के लोकांना तिथेही जाण्याची भीती वाटते
मुंबई : अनलॉक दोनच्या टप्प्यात मुंबई महानगर क्षेत्रातील लोकल आणि मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. तर, अन्य राज्यांतील मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र, आजच्या घडीला जर या सार्वजनिक प्रवासी सेवा सुरू झाल्या तरी त्यातून प्रवास करण्याची हिम्मत आमच्यात नाही, असे मत ६७ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या या सार्वजनिक सेवांमधून प्रवास केला तर कोरोनाची लागण होण्याची भीती त्यांना वाटत आहे.
लोकल सर्कलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून ही माहिती हाती आली आहे. २४१ जिल्ह्यांतील २४ हजार लोकांनी या सर्वेक्षणात आपला सहभाग नोंदवला आहे. मोनो आणि मेट्रो सेवा सुरू करण्याचा विचार असला तरी त्याला राज्य सरकारने अद्याप हिरवा कंदील दाखवलेला नाही. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननेसुद्धा आपल्या भागातील मेट्रो सुरू करण्याबाबतचे सूतोवाच केले आहे. शहरांमधील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. सरकारलाही सार्वजनिक प्रवासी सेवा सुरू करणे धोक्याचे वाटत आहे. या भागांतील २५ टक्के लोकांना लोकल किंवा मेट्रोतील प्रवासाची भीती वाटत नाही. तर, ८ टक्के लोकांना त्याबाबतचे मत व्यक्त करता आलेले नाही.
जिम आणि हॉटेलही नको
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी फक्त १५ टक्के जणांनी जिम आणि स्वीमिंग पूलचा वापर करू, असे मत नोंदविले आहे. ८५ टक्के लोकांना तिथेही जाण्याची भीती वाटते. तर, पुढील किमान तीन महिने तरी कोणत्याही सहलीना जाणार नाही. तसेच, कुठल्याही हॉटेलात वास्तव्य करणार नाही, असे मत ९३ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे.