- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: मालाडच्या सबरबन लॅबला स्थानिक आणि समाजसेवकांनी मिळून मंगळवारी टाळे ठोकले. या लॅबमुळे कोरोना संशयित व्यक्तींची याठिकाणी गर्दी होत असून त्यामुळे सामान्य लोकांच्या जीवाला धोका उदभवू शकतो, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मालाड पश्चिमच्या एव्हरशाईननगर परिसरात ही लॅब आहे. ज्या खासगी लॅबना कोरोनाची तपासणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यात सबरबन लॅबचाही समावेश आहे. मात्र मालाडमधील ही लॅब रहिवासी वस्तीत आहे. समाजसेवक नेवडा पुतमन यांनी 'लोकमत' ला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी वीस ते पंचवीस कोरोना संशयीत तपासणीसाठी येत होते. मुख्य म्हणजे जवळच असलेल्या इमारतीच्या शिडीवर ते सर्व बसून राहायचे. दाटीवाटीच्या या परिसरात गरजेच्या वस्तू आणण्यासाठी स्थानिकांची याठिकाणी ये जा सुरू असते. तसेच बाजूला दूध, बेकरी ही दुकाने असुन त्याच्या विरुद्ध दिशेला फळ आणि भाजीवाले बसतात. लॅबमध्ये तपासणीसाठी येणाऱ्यापैकी एक तरी कोरोनाग्रस्त असेल आणि तो स्थनिकांच्या संपर्कात आला तर अख्ख्या परिसराला सील करावे लागेल. याच भीतीमुळे आम्ही लॅबची ब्रांचं बंद करून टाकली'.याबाबत अधीक माहिती देताना पुतमन म्हणाले की याआधी आम्ही बऱ्याचदा पालिका, आरोग्य खाते आणि पोलिसांकडे याबाबत विनंती केली. मात्र कोणीच लक्ष दिले नाही. परिणामी आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. लॅब बंद करून आम्ही या सर्व परिसरात जंतुनाशक फवारणी करून घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. या इमारतीत स्थानिक नगरसेवक राहत असुन त्यांनी याबाबत आधीच पाऊल उचलणे आवश्यक होते. मात्र याच लॅबमधुन काही दिवसांपूर्वी त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घेतल्याचे समजते.