CoronaVirus News: मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीच्या कालावधीत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:33 AM2020-08-15T00:33:23+5:302020-08-15T00:34:12+5:30
मृत्यूचा आकडा सात हजार पार
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीत शुक्रवारी घट दिसून आली. गुरुवारी हे प्रमाण ८७ दिवसांचे होते. गेल्या २४ तासांमध्ये हे प्रमाण ८४ दिवसांवर आले आहे. तसेच रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दरही वाढून ०.८३ टक्के झाला आहे.
मुंबईत शुक्रवारी दिवसभरात तब्बल ९०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत ७९ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात ९७९ नवीन रुग्ण आढळून आले असून ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ७०३५ इतका आहे.
महापालिकेच्या अहवालानुसार सध्या १९,३५४ सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत एकूण एक लाख एक हजार ८६१ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी मृत झालेल्या ४७ कोरोना रुग्णांपैकी ३७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यातील ३३ रुग्ण पुरुष आणि १४ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णाचे वय ४० वर्षांखाली होते. ३५ जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित ११ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण बाधित रुग्णांचा आकडा एक लाख २८ हजार ५५० एवढा आहे.