- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्य सरकारने २५ जिल्ह्यांमध्ये दिलेली सवलत ही मोजून मापून टाकलेली उडी आहे. या कालावधीत आपण मास्क न घालता वाटेल तसे फिरू लागलो, तर तिसऱ्या लाटेत परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. सिरो सर्वेक्षणावर विसंबून राहणे पूर्णपणे धोक्याचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मंत्रालयातील काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी तिसरी लाट महाराष्ट्रात अटळ आहे, असे स्पष्ट केले आहे.
दहा ते बारा वर्षे वयोगटाचे रुग्ण अचानक समोर येत आहेत, असे सांगून डॉ. ओक म्हणाले, परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर असे रुग्ण समोर येतात. त्याआधी त्यांच्यामुळे किती जणांना लागण होत आहे, हे शोधणे कठीण होत आहे. सध्या रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी त्यात लक्षणीय घट नाही; पण रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर खूप वाढला ही समाधानाची बाब आहे. मात्र, लसीकरणाच्या बाबतीत आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साथ रोग नियंत्रण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते १९ कोटी लोकसंख्या असलेल्या ब्राझिलमध्ये ४८ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, तेथे पॉझिटिव्हिटी दर ३५ टक्के आहे. रशियात देखील २१ टक्के लसीकरण झाले. मात्र, तेथेही रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. आंतरराष्ट्रीय रुग्णसंख्येचा अभ्यास केला तर तिसरी लाट आपण रोखू शकत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.
आपण नियमितपणे मास्क वापरला. हॅण्ड सॅनिटायझरचा वापर केला आणि सुरक्षित अंतर ठेवून वावरलो, स्वतःची काळजी स्वतः घेतली तर आपल्याला तिसरी लाट थोपवता येईल. परिणामी, स्वतःची तब्येतही चांगली ठेवता येईल. सगळे सरकार करेल असे म्हणून जर आपण बेजबाबदारपणे वागू लागलो, तर सरकारने उपचार उपलब्ध करून देऊनही कोणीच मदतीला येऊ शकणार नाही.- डॉ. संजय ओक, अध्यक्ष, टास्क फोर्स
तिसऱ्या लाटेचा धोका डेल्टा आणि डेल्टा प्लस या विषाणूंनी आणखी वाढवला आहे. आपल्याकडे डेल्टा प्लसचे २४ रुग्ण सापडले आहेत. याचा अर्थ शोधत गेल्यास त्यांचे प्रमाण आणखी वाढेल. डेल्टा प्लसच्या रुग्णांमुळे पसरणाऱ्या साथीचे प्रमाण जगभरात जास्त आहे, हे लक्षात घेता आपण कोणताही धोका पत्करणे हे पूर्ण राज्याला संकटात टाकणारे असेल. त्यामुळे लोकांनीच आता मास्क आणि सॅनिटायझर यावर लक्ष दिले पाहिजे.- डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना