Join us

Coronavirus: कोरोना काळात पोलीस ठरले सर्वसामान्यांसाठी देवदूत; खाकीतील हात मदतीसाठी पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 1:35 AM

२३ मार्चपासून मुंबईत लॉकडाऊन जारी होताच, सगळे जण घरात बंदिस्त झाले. पोलीस अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांना घरी बसून काम करण्याची मुभा नव्हती.

मनीषा म्हात्रेमुंबई : कोरोनाच्या भीतीने जिथे जवळचे नातेवाईकही दूर झाले, अशावेळी खाकीतील हात त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. कुठे जेवण, औषध पोहोचवले, तर कुठे मुलगा, मुलगी बनून अग्नी दिला. जेव्हा सगळे घरात सुखरूप होते तेव्हा हाच पोलीस मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सेवा बजावताना दिसून आला. 

२३ मार्चपासून मुंबईत लॉकडाऊन जारी होताच, सगळे जण घरात बंदिस्त झाले. पोलीस अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांना घरी बसून काम करण्याची मुभा नव्हती. त्यामुळे पोलीस ठाण्यातील नियमित कर्तव्यांसह लॉकडाऊनची अंमलबजावणी, बाधितांवरील उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांबाहेरील बंदोबस्त, काेरोनाबाधित मृत्यू झाल्यास नातेवाईकांच्या जबाबांसह तपशीलांची नोंदणी, बेवारस मृतदेहांवरील अंत्यसंस्कार, मास्क न लावता बाहेर भटकणाऱ्यांची धरपकड, जोखीम पत्करून अवैध प्रवास करणाऱ्यांना अटकाव आदी सर्व कामे पोलीस ठाण्यांतील मनुष्यबळाकडून सुरू आहेत. दिल्लीतील धार्मिक संमेलनातून परतलेल्या व्यक्तींचा शोध, त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बेरोजगारीमुळे गावची वाट धरलेल्या मजुरांना पाठविण्याची जबाबदारी यामुळे पोलिसांभोवतीचा कोरोनाचा फास आणखी घट्ट झाला. बोलक्या ड्रोनद्वारे वरळी कोळीवाडा, धारावी, गोवंडीचे शिवाजीनगर, मालवणी अशा विविध झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागांमधल्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होते. 

काही पोलिसांनी कर्तव्यापलीकडे जात सेवा बजावली. यात सशस्त्र पोलीस दलातील रेहाना शेख यांनी पनवेलमधील ५० मुलांना दत्तक घेतले. तर कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकेचा तुटवडा भासत असताना कफपरेड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई तेजस सोनावणे यांनी खासगी गाडीचा रुग्णवाहिका म्हणून वापर करत २४ तास नागरिकांना मोफत सेवा पुरवली. कोरोना काळात जिथे जवळचे नातेवाईक लांब झाले अशावेळी शाहू नगर पोलीस ठाण्याच्या संध्या शिलवंत यांनी २४ तासांत ४ कोरोना रुग्णांंना अग्नी दिला. तर अंमलदार ज्ञानदेव वारे (५२) यांनीही कोरोनाच्या काळात हातात ग्लोज आणि तोंडाला फक्त मास्क असताना ५०० कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. तसेच पोलीस नाईक प्रभाकर देवकर यांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्कचा तुटवडा भासत असताना स्वतः मास्क बनवून घेतले आणि पोलीस दलाला साडेचार लाख मास्कचा साठा उपलब्ध करून दिला. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस