CoronaVirus : विलगीकरणासाठी निश्चित ५०० खाटांची क्षमता असलेल्या ९ रुग्णालयांना आणि २ हजार ९५७ फ्लॅट्सना वीजपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 02:32 PM2020-04-17T14:32:29+5:302020-04-17T14:33:30+5:30
अलगीकरणाच्या हेतूने निश्चित अतिरिक्त ४५५ फ्लॅट्सच्या विद्युतीकरणाचे काम सुरू : महाराष्ट्र होम गार्ड्सने वर्सोवा मैदानावरील ५०० जणांना सामावण्याची क्षमता असलेल्या ३० हजार चौरस फूट जागेतील शिबिराला २४ तासांच्या आत वीजपुरवठा...
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढतच आहे. अशावेळी कोरोनाबाधित रुग्णांवर ठिकठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. हे उपचार करतानाच उर्वरित सर्व घटकांवर सरकारला लक्ष ठेवावे लागत आहे. यातील एक प्रमुख घटक म्हणजे वीज असून, कोरोनाबाधितांसाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेला सुरळीत आणि वेगवान वीज पुरवठा करण्याचे काम अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड काम करत असून, त्यांच्याकडील मिळालेल्या माहितीनुसार, विलगीकरणासाठी निश्चित ५०० खाटांची क्षमता असलेल्या ९ रुग्णालयांना आणि २ हजार ९५७ फ्लॅट्सना वीजपुरवठा करण्यात आला आहे.
राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय या यंत्रणा अन्य वैधानिक प्राधिकरणांच्या मदतीने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अविश्रांत काम करत आहेत. लवकर निदान व विलगीकरणाला प्राधान्य देण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेले नवीन निर्देश कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक अशा महत्त्वपूर्ण पद्धतींमध्ये मोडत आहेत. परिणामी या दृष्टिकोनाचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर विलगीकरण आस्थापने उभारणे ही गरज झाली आहे. अनेक रिकाम्या इमारती तसेच कोणाचेही निवास नसलेल्या संकुलांचे रूपांतर विलगीकरण आस्थापनांमध्ये करण्यात आले आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड सरकारच्या मदतीने या विलगीकरण आस्थापनांमध्ये आपत्कालीन तत्त्वावर वीजजोडण्या व वीजपुरवठा करत असून, यातील बहुतांशी कामे पुर्ण झाल्याच्या मार्गावर आहेत. पश्चिम व पूर्व भागातील प्रभावित क्षेत्रांना प्राधान्य तत्त्वावर अखंडित वीजपुरवठा केला जात आहे. या विभागात शिवाजी नगर येथील मॅटर्निटी केअर सेंटर, अंधेरीतील मुंबई महानगरपालिका रुग्णालय आणि विलगीकरणाखाली असलेल्या अन्य काही निवासी भागांचा समावेश आहे. महानगरपालिका, जिल्हाधिकारी, नागरी संरक्षण संचालनालय आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) यांच्या मदतीने वीजजोडणी नसलेल्या अनेक आस्थापनांना वीजजोडण्या दिल्या आहेत.
---------------------------
- हे काम करताना इलेक्ट्रिसिटीचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अविश्रांत काम करत आहेत.
- अत्यंत निस्वार्थ भावाने सेवा देणारे ते खरेखुरे नायक आहेत.
- जनतेला सुरक्षितपणे जगणे शक्य करून देणे आणि लॉकडाउनच्या काळात गरज झालेला वीजपुरवठा त्यांना अखंडितपणे उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
- कर्मचारी वर्गास कामावर येण्यासाठी वाहतूक सुविधा दिली जात आहे.
- त्यांना दिवसातून ३ वेळा जेवण दिले जात आहे.
- स्वच्छतेसाठी आवश्यक साधने, मास्क, हातमोजे आदी सर्व संरक्षक उपकरणे पुरवून त्यांना सुसज्ज ठेवले जात आहे.