मुंबई - कोरोना विषाणुचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले असून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षही या संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे सरसावला आहे. प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पत्र पाठवून व त्यानंतर ऑडियो ब्रिजव्दारे संवाद साधून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. आता मदतीसाठी हेल्पलाईन व मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्यात लॉक डाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गरीब, रोजंदारी कामगार यांच्यासह संकटात असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपत्कालीन मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यासाठी समन्वयक व स्वतंत्र हेल्पलाईन नंबरही उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसही या संकटात मदतीसाठी सक्रीय झाली असून प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सुरु केल्या आहेत. आपल्याला अन्न, औषधे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज असेल तर आपण घरात थांबून फक्त एक फोन कॉल करा. काँग्रेस कार्यकर्ते आपल्या मदतीला येतील. युवक काँग्रेसने याआधीच शहरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेवण पोहचवण्याचे काम सुरु केलेले आहे. राज्यात रक्ताचा तुडवडा जाणवत असल्याने युवक काँग्रेसने रक्तदान मोहिमही सुरु केली आहे. १० हजार पिशव्या रक्त संकलन करण्याचा त्यांचा संकल्प आहे.कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना काँग्रेस कार्यकर्ते मदतीसाठी रस्त्यावर उतरले असले तरी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच मदत करण्यात येत आहे.
coronavirus : कोरोनाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा आपत्कालीन मदत कक्ष व हेल्पलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 3:51 PM