Coronavirus : राज्यभर बंदी आदेश लागू, सरकारकडून कडक उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:08 AM2020-03-16T06:08:43+5:302020-03-16T06:39:41+5:30

मुंबई शहरात प्रतिबंधात्मक आदेश, सिनेमा-नाट्यगृहे, मॉल्स बंद...

Coronavirus: Enforcement of ban orders across the state, tightening measures by the government to prevent Corona | Coronavirus : राज्यभर बंदी आदेश लागू, सरकारकडून कडक उपाययोजना

Coronavirus : राज्यभर बंदी आदेश लागू, सरकारकडून कडक उपाययोजना

Next

मुंबई : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने राज्यातील सिनेमागृहे, म्युझियम व नाट्यगृहे बंद ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली. तसेच मुंबई शहरात खासगी पर्यटन संस्था इतर सहल आयोजन वा तत्सम व्यक्तींना परदेशात तसेच देशांतर्गत किंवा स्थानिक पातळीवर ग्रुप सहली, पर्यटन दौरे आयोजित करण्यास प्रतिबंधात्मक आदेशानुसार मनाई केली आहे. शासकीय आदेशाचे उल्लंघन करून शिर्डी परिक्रमेच्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३३ वर पोहोचली असून औरंगाबाद येथे ५९ वर्षीय महिलेस याची लागण झाली आहे. नऊ रुग्णांवर कस्तुरबा येथील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. येथे ८० संशयित रुग्ण आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त कुमक तैनात करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आतापर्यंत शाळा, महाविद्यालये व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि मर्यादित क्षेत्रातील सिनेमाघरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता राज्यभरातील सिनेमागृह, नाट्यगृह व म्युझियम बंद ठेवण्याचे आदेश आहेत. शिर्डीला गुढीपाडव्याला हजारो लोक पायी पोहोचतात. सर्वांच्या हितासाठी यंदा या प्रथेला बाजूला ठेवायला हवे. शिर्डी संस्थांनने याबाबत भक्तांना आवाहन करावे, असे सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले.

आतापर्यंत १५८४ विमानांतून राज्यात आलेल्या १,८१,९२५ जणांची तपासणी केली आहे. त्यापैकी लक्षण आढळलेल्या ७५८ लोकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यापैकी ६६९ लोकांचे नमुने नकारत्मक आले आहेत. तर, ३२ जणांचे पॉझिटिव्ह आले. सध्या ७५ संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.



बुलडाण्यातील वृद्धाचा मृत्यू ‘कोरोना’मुळे नाही, अहवाल निगेटिव्ह
बुलडाणा : कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्यानंतर शनिवारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) उपचारादरम्यान दगावलेल्या ७१ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे रविवारी प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू तपासणी प्रयोगशाळेतून त्यांचा ‘कोरोना निगेटिव्ह’ असा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांकडे रविवारी दुपारी प्राप्त झाला.

मुंबईत नवा रुग्ण नाही
राज्यभरातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी ३३ वर गेला. मात्र मुंबईसह मुंबई महानगर परिसरातील लोकांसाठी दिलाश्याची बाब म्हणजे रविवारी येथे एकाही नव्या कोरोना संंशयित रुग्णाची नोंद झालेली नाही. रविवारी कस्तुरबा रुग्णालयात ४३ जणांची कोरोना चाचणी झाली, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

पुणेकरांवर निर्बंध : पुणे शहरात कोरोना विषाणूंची बाधा झालेले रुग्ण आढळल्याने प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, ओपन पार्क बंद करण्यात आले असून फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तेवढी सुरू राहतील, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.
रुग्णालय फुल्ल, देवालये ओस!
कोरोना विषाणूच्या धास्तीने साधी सर्दी, पडसे झालेल्या रुग्णांनी दवाखान्यात धाव घेतली असून रविवारी अनेक रुग्णालयात गर्दी होती. तर दुसरीकडे, राज्यातील देवस्थानांमधील भाविकांची गर्दी कमी झाली आहे. सिद्धिविनायक (मुंबई), महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर), ज्योतिबा देवस्थान (वाडी रत्नागिरी), अंबाबाई देवस्थान (तुळजापूर) येथील गर्दी ओसरली.

देशातील रुग्णांची संख्या १०७
नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता १०७ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात नव्याने १२ रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्ली आणि कर्नाटकात मृत्युमुखी पडलेल्या दोन जणांचा यात समावेश आहे. दिल्लीमध्ये ७, उत्तर प्रदेशात ११, कर्नाटकात ६, महाराष्ट्रात ३१, लडाख ३ आणि जम्मू-काश्मिरात २ रुग्ण आहेत. तेलंगणात ३, राजस्थानात २ तर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पंजाबात प्रत्येकी एक रुग्ण आहे. केरळात २२ रुग्ण आहेत. यात डिस्चार्ज झालेल्या ३ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णात १७ विदेशी आहेत. यातील १६ इटलीचे पर्यटक आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४००० लोकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. तर, ४२ हजार लोकांवर निगराणी ठेवली जात आहे. ८० लाखांहून अधिक एन ९५ मास्कची आॅर्डर देण्यात आली आहे.

ब्रिटिश नागरिकाला संसर्ग
केरळातील कोची विमानतळावर दुबईला जाणाऱ्या
२० प्रवाशांना उड्डाणापूर्वी रविवारी ताब्यात घेण्यात आले. एका ब्रिटिश नागरिकाला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे केरळातील रुग्णांची संख्या आता २० वर पोहोचली आहे. ब्रिटनचे १९ प्रवासी मुन्नार शहरात सुट्टीनिमित्त आले होते आणि निगराणीत होते. हा संक्रमित रुग्ण याच समूहातील आहे.

75,620 बरे होऊन घरीही गेले!
जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील कोरोनाबाधित किती बरे झाले व किती मृत झाले यांची आकडेवारी सेकंदा सेकंदाला अपडेट करणे सुरू केले आहे. त्यानुसार जगभरात बातमी प्रसिद्धीला जाईपर्यंत १,६२,६८७ रुग्ण कोरोनाबाधित झाले असले तरीही त्यातील ७३,९६८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत जगभरात ६,०६५ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

बाप्पांनाही मास्क : नाशिकमध्ये कोरोनापासून बचावासाठी विघ्नहर्त्या गणरायाच्या मुखाला मास्क लावण्यात आला आहे. यामागे भाविकांनीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, असा संदेश देण्याचा मंदिर व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे.

Web Title: Coronavirus: Enforcement of ban orders across the state, tightening measures by the government to prevent Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.