Coronavirus: मजूर-कामगारांच्या परतीची उद्योजकांना चिंता; बिल्डर, व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 06:30 AM2020-05-07T06:30:56+5:302020-05-07T06:31:09+5:30
लॉकडाउननंतर काम सुरू करणे अवघड होणार
मुंबई : सध्या हजारो मजुरांचे उलट स्थलांतर सुरू आहे. मात्र, ते गावी गेल्यानंतर पुन्हा लवकर पतरणार नाहीत. त्यामुळे लॉकडाउनचे निर्बंध सरल्यानंतर उद्योजक, बिल्डर व अन्य व्यावसायिकांना आपले कामकाज पूर्वपदावर आणताना अडथळे निर्माण होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावी जाऊ नका, थोडे दिवस थांबा, कामे लवकरच सुरू होतील, अशा विनवण्या अनेक ठिकाणी या मजुरांना केल्या जात आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रात सुरक्षेच्या उपायांचे पालन करून कामे सुरू करण्याची परवानगी दिली असती तर मजुरांचे स्थलांतर रोखता आले असते, असे मत ‘नरेडको’चे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी नुकतेच एका वेबिनारमध्ये व्यक्त केले होते. लघू व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमधल्या कामगारांमध्ये परप्रांतीयांचा भरणा जास्त आहे. ते गावी गेल्यानंतर त्यांना पुन्हा परत आणणे अवघड होईल. लॉकडाउन संपून हे उद्योग सुरू करता यावेत यासाठी सर्वांचीच धडपड सुरू आहे. परंतु, ती परवानगी मिळाल्यानंतर जर पुरेसे कामगारच नसतील तर उत्पादन प्रक्रिया राबवायची कशी, असा सवाल ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप पारेख यांनी उपस्थित केला आहे.
कामगारांना उद्योजक वेतन देत आहेत. गावी परतल्यानंतर किमान १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. प्रवासात कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे इथेच थांबा, अशी विनंती उद्योजक कामगारांना करीत आहेत. परंतु, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे ‘टिसा’च्या एकनाथ सोनावणे यांनी सांगितले.
‘तीन-चार महिने परत येणार नाहीत’
हॉटेल्स बंद असली तरी येथील मजुरांचे दोन वेळचे जेवण व राहण्याची व्यवस्था केली जात होती. मार्च महिन्याचे पूर्ण व एप्रिलचे निम्मे वेतनही त्यांना दिले होते. परंतु, मेच्या पगाराची शाश्वती त्यांनाही नव्हती. गेलेले मजूर किमान तीन-चार महिने तरी माघारी येण्याची चिन्हे नसल्याचे मत हॉटेल असोसिएशनचे सदस्य रत्नाकर शेट्टी यांनी व्यक्त केले.