मुंबई : पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून प्रतिबंधित इमारतीत प्रवेश करणाऱ्या तिघांविरुद्ध काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्रिकुटाकडे कुठलेही ओळखपत्र सापडले नसून तपास सुरू आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ ते ३० वर्षे वयोगटातील तिघांनी चिंचपोकळी परिसरातील विक्रांत सदन सोसायटीत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी या इमारतीत एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला होता. त्यानुसार बीएमसी आणि पोलिसांनी या इमारतीला सील केले. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तिघांनी इमारतीत प्रवेश केला आणि थर्मलद्वारे तापमान तपासण्यास सुरुवात केली. ते बीएमसीच्या आरोग्य विभागाचे असल्याचा दावा करत होते. स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. घटनेची वर्दी मिळताच काळाचौकी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांच्याकडे बीएमसीचे ओळखपत्र किंवा तपासणीसाठी परवानगी नव्हती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंग पाटील यांनी दुजोरा दिला.तरुणांना नोटीसअनिकेत अंकुश चौगुले (२५), दीपक वाघ (२४) आणि अक्षय अशोक चव्हाण (२२) या तिघांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. त्यांच्याकडे अधिक तपास सुरु आहे. तिघेही करीरोडच्या महादेव पालव मार्ग येथील रहिवाशी असून चौघुलेचा व्यवसाय आहे, तर चव्हाण खासगी कंपनीत नोकरीला आहे.
CoronaVirus: पालिका अधिकारी असल्याचे सांगत प्रतिबंधित इमारतीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 5:29 AM