मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर उदय सामंत यांनी सविस्तर चर्चा केली. समितीचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाईल. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी मंगळवारच्या कॉन्फरन्सिंगबाबत अधिक माहिती देताना सांगितले.
बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. १ ते १५ जुलैदरम्यान पदवी आणि पदव्युत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) २० ते ३० जुलै रोजी घेऊन १५ आॅगस्टपर्यंत निकाल जाहीर करून १ सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करता येईल का, याची चाचपणी करण्यात आली. याशिवाय, लॉकडाउनचा कालावधी हा विद्यार्थ्यांची हजेरी म्हणून ग्राह्य धरण्याबाबतही चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयात कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, तर शेवटच्या वर्षाची परीक्षा घेतली जाईल. तसेच एम.फिल व पीएच.डी.च्या तोंडी परीक्षेबाबतही चर्चा करण्यात आली. या सर्व शक्यतांवर कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत म्हणाले.
या व्हिडीओ कॉन्फरन्सला उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक अभय वाघ तसेच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झाले होते.प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशन केंद्रराज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्रे तयार करावी. या केंद्रांच्या मदतीने पालक, विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे निरसन करावे, अशा सूचना सामंत यांनी दिल्या. सीईटीसाठी समिती सीईटीबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. बारावीनंतर आणि पदव्युत्तरसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या नियोजनासंदर्भात सामंत यांनी सविस्तर चर्चा केली. या समितीने सर्व उपाययोजना करून वेळापत्रक तयार करावे, असे त्यांनी सांगितले.