Coronavirus : कोरोनाच्या संशयित रुग्णांवर जीपीएसद्वारे नजर; मोबाइल लोकेशन करणार ट्रॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:37 AM2020-03-20T07:37:09+5:302020-03-20T07:37:24+5:30
प्रवाशांच्या मोबाइलवरील जीपीएस लोकेशनद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या मुंबईकरांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे त्यांना घरातच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. तरीही काही जण हा नियम पाळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. परिणामी, या प्रवाशांच्या मोबाइलवरील जीपीएस लोकेशनद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
दक्षिण कोरियामधील सरकारने मोबाइल अॅपद्वारे लोकांचे लोकेशन ट्रॅक करून संशयित आणि कोरोनाग्रस्त रुग्णांवर लक्ष ठेवले आहे. या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य होत आहे. मुंबईतही गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या लोकांची संख्याही अधिक असल्याने या सर्वांवर लक्ष ठेवणे आव्हान ठरत आहे. कोरोनाची लक्षणे आठ-दहा दिवसांनंतर दिसून येत असल्याने अशा प्रवाशांना त्यांच्या घरातच १४ दिवस राहण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या मोबाइलवरचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी पोलिसांची मदत पालिका प्रशासन करणार आहे.
राज्यात ४८ रुग्ण
मुंबई : गुरुवारी अहमदनगर, उल्हासनगर आणि मुंबईत नवे तीन रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. नवे तिन्ही रुग्ण परदेशातून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील ५१ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळला असून ते आपल्या पत्नीसह दुबईला गेले होते. मात्र त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर लंडनहून परतलेली मुलुंडमधील २२ वर्षीय तरुणी पॉझिटिव्ह आहे. तसेच, दुबईहून आलेली उल्हासनगर येथील ४७ वर्षीय महिला कोरोनाबाधित आहे.
१८ जानेवारीपासून आजपर्यंत १,०३६ संशयित रुग्णांना भरती करण्यात
आले असून त्यापैकी ९७१ जणांचे
रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रतिबंध व नियंत्रणाची पूर्वतयारी म्हणून सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
परदेशातून आलेल्या एकूण १,३०५ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा तपासणी व पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
देशाचा आकडा १९७
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले नवे २८ रुग्ण आढळून आल्याने या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या १९७ वर गेली आहे. या कोरोनाग्रस्तांमध्ये २५ विदेशी नागरिकांचा समावेश असून त्यात इटलीचे १७, फिलिपिन्सचे ३, ब्रिटनचे २ तसेच कॅनडा, इंडोनेशिया, सिंगापूरच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.
कोरोनाच्या विषाणूचा देशात सामूहिक संसर्ग झालेला नाही. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या अधिकाऱ्याने सांगितले की, श्वसनविकार बळावलेल्या सुमारे ८२० लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा करून त्यांची चाचणी केली. यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही, ही बाब दिलासादायक आहे.