Join us

Coronavirus: कुटुंबाच्या दडपणीसोबतच पोलिसांवरचा ताण कायम; कोरोना संकटकाळात मोठं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 3:21 AM

मुंबईत आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १९०० पोलिसांनी कोरोनावर मातही केली. तर या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ३८ पोलिसांना जीव गमवावा लागला.

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत लॉकडाऊनच्या शंभर दिवसांत सगळ्यात जास्त ताण पोलिसांवर होता आणि आताही कायम आहे. अन्य शासकीय विभागांतील कर्मचारी काही प्रमाणात कार्यरत आहेत. पोलीस मात्र १०० टक्के रस्त्यावर उतरून सेवा बजावताना दिसत आहे. त्यात, विविध जबाबदारीबरोबर पुन्हा एकदा कडक कारवाई, तसेच डोके वर काढणाऱ्या गुन्हेगारी, सायबर क्राईमवर आवर घालण्याचे आव्हान पोलिसांवर आहे.            

मुंबईत आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १९०० पोलिसांनी कोरोनावर मातही केली. तर या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ३८ पोलिसांना जीव गमवावा लागला. अत्यावश्यक सेवेत असल्याने पोलिसांना घरबसल्या काम करण्याची मुभा नाही. त्यामुळे लॉकडाऊन, जमावबंदी आदेशाच्या अंमलबजावणीसह कस्तुरबा रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधींपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वारंटाइनचे शिक्के असलेल्या व्यक्ती स्थानबद्ध आहेत ना याची खातरजमा, त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गावाची वाट धरलेल्या मजुरांच्या पाठवणीच्या जबाबदारीने पोलिसांभोवतीचा फास आणखी घट्ट झाला. कोरोनाची लागण झालेल्या इमारती पालिकेने ताब्यात घेतल्यानंतर तेथील बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर आहे.पोलीस ठाण्यात कार्यरत मनुष्यबळावर सर्वाधिक ताण आहे. पोलिसांनी कर्तव्यापलीकडे जाऊन काम केले. यानुसार घरातून बाहेर पडलेली व्यक्ती सुखरूप आणि संसर्गाची लागण न होता परतेल का, हे दडपण पोलिसांसह त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या वसाहतींवर आजही आहे.

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस