Join us

Coronavirus: गावाकडे वडिलांना ह्रदयविकाराचा झटका, मुलाने सायकलवरुन २१०० किमीचा प्रवास सुरु केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 4:26 PM

देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वच वाहतूकव्यवस्था बंद आहे. अत्यावश्यक सेवांसाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना परवानगी देण्यात येते. मात्र, त्या परवानगीलाही गाड्यांची किंवा वाहनांची कमतरता भासत आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, आपलं गाव-घर सोडून कामाच्या शोधात शहरांकडे आलेल्या नागरिकांनी आपल्या गावचा रस्ता धरला. मात्र, जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाल्याने या नागरिकांचे हाल होऊ लागले. अनेकांची उपासमार होऊन, कित्येकांना मैल न मैल पायी प्रवास करावा लागला. त्यानंतर, सरकाराने या नागरिकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. मात्र, अद्यापही काही अपरिहार्य कारणासाठी नागरिकांना गावाकडे जावेच लागत  आहे. 

देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वच वाहतूकव्यवस्था बंद आहे. अत्यावश्यक सेवांसाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना परवानगी देण्यात येते. मात्र, त्या परवानगीलाही गाड्यांची किंवा वाहनांची कमतरता भासत आहे. अशातच मजूरवर्ग चक्क पायी प्रवास करताना दिसून येतो. तर, काहीजण दुचाकीवरुन मैल न मैल दूर असलेल्या गावाकडे जात आहेत. काहींनी सायकलीचा वापर केला आहे. मुंबईतील आरिफनेही २१०० किमी दूर असलेल्या आपल्या जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी गावाकडे सायकलवरुनच प्रवास सुरु केला. आपल्या ६० वर्षीय वडिलांना भेटण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे सायकल प्रवास. 

१ एप्रिल रोजी आरिफच्या वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर, लॉकडाऊन असल्याने चक्क आपली सायकल घेऊन आरिफने काश्मीरच्या प्रवासाला सुरुवात केली. मात्र, आरिफची कठीण परिस्थिती समजताच, सीआरपीएफ जवानांनी आरिफला मदत केली. संकटकाळात देवच मदतीला यावा, तसं आरिफच्या मदतीला सीआरपीएफ जवान धावले. सीआरपीएफच्या काश्मीरस्थित हेल्पलाईनच्या मदतीने आरिफचे वडिल वजीर हुसैन यांना रविवारी पंजग्रेन गावातून विशेष हेलिकॉप्टरने रुग्णालयात पोहोचविण्यात आले. आरिफबाबत एका पत्रकाराकडून माहिती मिळाल्याचे सीआरपीएफचे महासंचालक जुल्फिकार हसन यांनी सांगितलं. तसेच, आरिफलाही फोन करुन याबाबत माहिती दिली असून ५ राज्यांमधील सीआरपीएफ पथकाचीही मदत मिळत आहे. रविवारी गुजरातच्या वडोदरा येथे रविवारी आरिफला मास्क, सॅटनिटायझर्स, जेवण यांसह २ हजार रुपये मदतही देण्यात आली. 

देशात सध्या लॉकडाऊन असल्याने आरिफलाही सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथे त्याची सोय करण्यात आली आहे. तसेच, त्याच्या वडिलांचीही पूर्णपणे काळजी घेण्यात येत असल्याची खात्री आरिफला देण्यात आली आहे. मात्र, आरिफने वडिलांना भेटण्याचा आग्रह धरल्याने ट्रकमधून राजस्थानपर्यंत आरिफच्या येण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर, पुढील प्रवासाचीही सोय करण्यात येईल, असे सीआरपीएफकडून सांगण्यात आले. दरम्यान, आरिफच्या वडिलांवर सध्या जम्मूतील एका सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापोलिसभारतीय जवानजम्मू-काश्मीरमुंबई