Coronavirus: स्थानिक वस्तुस्थितीबाबत वरळीकर अनभिज्ञ; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील अत्यंत वाईट अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 01:45 AM2020-05-09T01:45:58+5:302020-05-09T07:20:10+5:30
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लॉकडाउन लागू झाल्यापासून आजपर्यंत वरळीकरांचे हालच सुरू आहेत.
मुंबई : मुंबईत सर्वाधिक कोरोनोचे रुग्ण आढळून आलेल्या वरळी कोळीवाड्याची अवस्था आज अत्यंत वाईट झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आमदार असलेल्या वरळी कोळीवाड्यातील कोरोनाचा पॉलिटिकल इश्यू केला जात असून, येथील वस्तुस्थिती लपविली जात आहे. येथे झालेले मृत्यू, नागरिकांना झालेला संसर्ग; अशा अनेक गोष्टींच्या अहवालाबाबत वरळीकर अनभिज्ञ आहेत.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लॉकडाउन लागू झाल्यापासून आजपर्यंत वरळीकरांचे हालच सुरू आहेत. येथील पहारा शिथिल करा, असे येथील नागरिकांचे मुळीच म्हणणे नाही. मात्र वरळीकरांना किमान गरजेच्या वस्तू, आवश्यक असे साहित्य तरी उपलब्ध होईल याकडे लक्ष द्या, असे म्हणणे थेट वरळीकरांनीच मांडले आहे.
वरळी गावाला एकाच ठिकाणाहून प्रवेश आहे आणि उर्वरित तिन्ही बाजूने समुद्र आहे. हा पूर्ण भाग बंद करण्यात आला आहे. हा भाग बंद करण्यात आल्याने येथे भाजी येत नाही. फळे येत नाहीत. गरोदर महिलांना येथे सकस आहार मिळत नाही. केवळ सरकारने पाठविलेल्या तांदूळ, डाळ, गव्हाचे पीठ, मसाले, कांदे आणि बटाटे यावर वरळीकरांना दिवस काढावे लागत आहेत. उर्वरित साहित्य त्यांना मिळत नाही.
वरळी कोळीवाडा गोल्फा देवी मंदिर परिसर म्हणजे वरळी कोळीवाड्यात ही समस्या आहे. येथे ६० हजार लोक राहतात. १२ हजार घरे आहेत. येथील प्रत्येकाला ही समस्या भेडसावत आहे. वरळीकरांना पुरेसे साहित्य मिळावे; ही त्यांची विनंती आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी प्राप्त माहितीनुसार येथील नागरिकांना बॉक्समधून फळे किंवा तत्सम साहित्य आणण्याची परवानगी मिळाली होती, असे एका वरळीकराने सांगितले.
प्राधिकरणांनी समन्वय साधावा
वरळी असो, धारावी असो वा मुंबईतला कोणताही भाग असो. मुंबईकरांनी कोरोनाला नष्ट करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे; आणि प्रशासनानेदेखील मुंबईकरांच्या अत्यावश्यक सेवेच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. आपणाला एकत्र येत लवकरात लवकर कोरोनाचा समूळ नाश करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक प्राधिकरणाने एकमेकांशी योग्य तो समन्वय साधणे आवश्यक आहे. - गॉडफ्रे पिमेंटा, संस्थापक-अध्यक्ष, वॉचडॉग फाउंडेशन
सुरुवातीला मुंबई महापालिका दररोज कोणत्या वॉर्डमध्ये किती कोरोनाबाधित आहेत? याचा एक नकाशा प्रसिद्ध करीत होती. या नकाशात कोणत्या वॉर्डमध्ये किती कोरोनाबाधित आहेत? किती रुग्ण बरे झाले आहेत? अशी सर्व माहिती मिळत होती. मात्र आता तो नकाशादेखील प्रसिद्ध केला जात नाही. त्यामुळे कोणत्या वॉर्डमध्ये किती कोरोनाबाधित आहेत? याची नेमकी माहिती मिळत नाही. आम्ही सोशल डिस्टन्स पाळत आहोत. आमचे म्हणणे एवढेच आहे की गरोदर महिला, लहाने मुले, ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. गरजेच्या वस्तू आमच्यापर्यंत पोहोचाव्यात एवढेच आमचे म्हणणे आहे. - शरद वासुदेव कोळी, अध्यक्ष, गोल्फादेवी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी
१० रुपयांचे साहित्य मिळतेय ९० रुपयांना
भाजीपाला येथे मिळत नाही. कोथिंबीर, मिरची, आलं या साहित्याला पूर्वी जेथे १० रुपये मोजावे लागत होते तेथे आजघडीला ९० रुपये मोजावे लागत आहेत.
काय खरे, काय खोटे?
सुरुवातीला वरळी कोळीवाड्यात कोरोनाची प्रकरणे आढळू लागली, अशी बोंबाबोब करण्यात आली. आणि नंतर या सगळ्यावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे, असाही दावा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र खरे काय आणि खोटे काय? हे कोणालाच माहीत नाही.
- वरळी कोळीवाड्यात १०० दुकाने आहेत.
- दुकाने सकाळी काही काळ उघडी असतात.
- दुकानात साहित्य नसल्याने काहीच फायदा होत नाही.
- वरळीकर डाळ-भात किती दिवस खाणार?
- पोषक आहार येथे मिळत नाही.
- फक्त दूध, तांदूळ आणि डाळ म्हणजे अत्यावश्यक सेवा नाही हे समजून घ्या.
- वरळीकरांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून काही तरी करा.
- बाळ होणा-या आणि बाळ झालेल्या महिलांसाठी काही तरी विशेष व्यवस्था करा
- लॉकडाउन लागू झाल्यापासून वरळी कोळीवाडा बंद आहे.