मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून, येत्या दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जात असतानाच आता पूर्वीसारखा लॉकडाऊन लागला तरी पुन्हा आर्थिक संकट ओढावेल की काय...? अशी भिती मुंबईकरांच्या मनात निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी बहुतांशी मुंबईकरांना लॉकडाऊन नको असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. विशेषत: मुंबईचा आकडा आता ८ हजारांवर येऊन ठेपला आहे. हा वेग असाच राहिला तर कोरोना रुग्ण १० हजार होण्यास वेळ लागणार नाही. परिणामी हा आकडा रोखायचा असेल तर लॉकडाऊन हाच पर्याय नाही मात्र कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात नाही. गर्दीला तर महापूर आला आहे. पश्चिम उपनगरात बोरीवली, अंधेरी, कांदिवलीसह लगतच्या परिसरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे. पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, गोवंडीसह लगतच्या परिसरात देखील कोरोनाचा कहर होतो आहे. धारावीसारख्या झोपड्यांच्या परिसरातदेखील कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. दादर आणि माहिममध्ये हिच परिस्थिती आहे. दादरसारख्या बाजारपेठांनी तर गर्दीचा उच्चांक गाठला असून, अशा गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांचा आकडा असाच वाढत राहिला आणि लॉकडाऊन लागले तर पुन्हा आर्थिक संकट ओढावेल, अशी भिती मुंबईकरांना आहे. संचारबंदीने रोजगारावर गदाकोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रात्री ८ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या बंदीत बाजारपेठा बंद केल्या जात आहेत. मात्र ज्या बाजारपेठांतील विक्रेत्यांचे व्यवसाय लहान आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे. सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत ज्यांचा व्यवसाय चांगला होतो. ज्याच्यावर त्यांचे पोट भरते; अशा लहान, किरकोळ वस्तू विकणा-या व्यवसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे, अशांनी कसे जगायचे ? असा सवाल आता बाजारपेठांतून उपस्थित केला आहे.भारत सरकारच्या आदेशान्वये मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६ जानेवारीपासून कोविड - १९ लसीकरण मोहीम कार्यन्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडीया या कंपनीची कोविशिल्ड लस उपलब्ध करुन देण्यात आली. तर १५ मार्च २०२१ पासुन भारत बायोटेक या कंपनी निर्मित को-व्हॅक्सीन ही लस वापरण्यासाठी भारत सरकारची मंजुरी प्राप्त झाली आहे. तसेच या व्यतिरिक्त इतर काही वेगळ्या लसी देखील भविष्यात उपलब्ध होणार आहेत. सध्या सदर दोन्ही प्रकारच्या लसी मुंबईसह देशात वापरण्यात येत असुन दोन्ही लसी परिणामकारक आहेत.कोविड - १९ या आजाराचा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढत असून या दृष्टीने प्रतिबंधासाठी महानगरपालिकेद्वारे व शासनाद्वारे विविध स्तरीय उपाययोजना नियमितपणे राबविण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे हा देखील याच उपाययोजनांचा एक भाग आहे. मात्र, लस घेतलेली असो किंवा अद्याप घ्यावयाची बाकी असो, या दोन्ही बाबत सर्वच नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी संबंधित नियमांची परिपूर्ण व काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, निर्जंतुकीकरण द्राव्याचा (सॅनिटायझर) उपयोग करणे किंवा वारंवार हात धुणे या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत.nकोविड - १९ या संसर्गजन्य आजारावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे ज्यांना कोविड बाधा झाली आहे, अशा व्यक्ती किंवा त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांचे विलगीकरण - अलगीकरण करणे देखील गरजेचे आहे. यानिमित्ताने महानगरपालिका प्रशासनातर्फे पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी कोविड विषयक सर्व नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे.
coronavirus: मुंबईकरांच्या मनात लॉकडाऊनची भीती, दोन दिवसांत मोठ्या बदलांची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 4:20 AM