coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या लाटेची भीती! ४२ दिवसांनंतर झाली सर्वाधिक रुग्णांची नोंद
By बाळकृष्ण परब | Published: February 16, 2021 11:23 AM2021-02-16T11:23:43+5:302021-02-16T11:25:15+5:30
Coronavirus in Maharashtra : आता मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे
मुंबई - गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा (coronavirus) कहर अनुभवल्यानंतर गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत आली आहे. मात्र आता मुंबईसह महाराष्ट्रामध्ये (Coronavirus in Maharashtra) गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येक वेगाने घट झाल्यानंतर काल ४२ दिवसांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात देशातील कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या ३३६५ रुग्णांची नोंद झाली. तर केरळमध्ये २८८४ रुग्ण सापडले. ३० नोव्हेंबरनंतर प्रथमच महाराष्ट्रात एवढे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची नवी लाट आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Fear of new wave of covid-19 in Maharashtra)
सोमवारी देशभरात कोरोनाच्या ९ हजार ९३ रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या दोन सोमवारांची विचार केल्यास रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात सापडण्याचे कारण हे साप्ताहिक सुट्टीमुळे कर्मचाऱ्यांची कमी संख्या आणि कमी टेस्टिंग असल्याचे सांगितले जाते. या सोमवारी ४.९ लाखांहून कमी चाचण्या झाल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांमधील हा सर्वात कमी आकडा आहे. दरम्यान सोमवारी देशभरात कोरोनामुळे ८२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण मृतांचा आकडा हा १ लाख ५५ हजारांपर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग्ण जर सातत्याने वाढत राहिले तर आम्हाला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कठोर पावले उचलावी लागतील. सोमवारी राज्यात कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ६७ हजार ६४३ झाली आहे. तर मृतांची संख्या ही ५१ हजार ५५२ एवढी झाली आहे.
कोरोनाचे वाढते रुग्ण विचारात घेऊन बीएमसीने धारावीमधील काही भागात मोबाइल टेस्टिंग व्हॅन तैनात केल्या आहेत. धारावी, दादर आणि माहीमचा समावेश असलेल्या जी नॉर्थ वॉर्डमध्ये साप्ताहिक रुग्ण वाढ ही ०.१२ टक्के दिसून आली आहे.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन महाराष्ट्र सरकारने केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर टेस्ट अनिवार्य केली आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत सध्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने दोन्ही राज्यांमध्ये हायलेव्हल टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.