मनीषा म्हात्रे
मुंबई : पन्नाशी उलटलेल्या तीन पोलिसांच्या मृत्यूनंतर खडबडून जाग आलेल्या मुंबई पोलीस दलाने अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सूचनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे आजारी तसेच पन्नाशी उलटलेल्यांना सुट्टी देण्यात येत आहे. उशिरा का होईना, पण या निर्णयामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा शंभरच्या वर गेला आहे. यातील ७ पोलीस बरे झाले असून १०० जणांवर उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील ४० हून अधिक पोलिसांचा समावेश आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महिन्याभरापूर्वी ५५ वर्षे किंवा त्याहून जास्त वय असलेल्या, मधुमेह किंवा हृदयरोगाने त्रस्त शिपाई ते साहाय्यक उपनिरीक्षकांना कामावर बोलावू नका, अशा तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष करीत, ही बाब परिस्थितीनुसार अंमलात आणावी, असा अर्थ घेत या वयोगटातील पोलिसांना कामावर बोलावणे सुरूच ठेवले. तर काहींना बंदोबस्तालाही जुंपले. अशात तीन दिवसांत पन्नाशी ओलांडलेल्या तीन पोलिसांचा कोरोनाने बळी घेतल्यानंतरवाहतूक पोलिसांसह पोलीस ठाणे तसेच अन्य शाखांमधील ५५ वर्षांपुढील अंमलदारांना सुट्टीवर पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस दलात पन्नाशी उलटलेल्या व आजारी असलेल्या अंमलदारांची माहिती आता गोळा करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष कक्ष तयार केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शिवाय पोलीस ठाण्याकडून यासंदर्भात माहिती दिल्याचेही एका वरिष्ठ निरीक्षकाने सांगितले. पहिल्या टप्प्यात ५५ वर्षीय पोलिसांना ३ मे पर्यन्त घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर ५२ वर्षावरील मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना मुंबई पोलिसांकडून मंगळवारी देण्यात आल्या आहेत.
आजारी असलेल्यांना आधीच घरी थांबवले५५ पेक्षा जास्त वय तसेच आजारी पोलिसांना कामावर बोलावू नका, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. मात्र कामाच्या ताणामुळे प्रभारींकडून त्या अंमलात आणल्या गेल्या नसाव्यात. सध्या आजारी पोलिसांचे प्रमाण अधिक आहे. ६० हून अधिक पोलीस डायलेसिसवर आहेत. त्यामुळे आजारी पोलिसांना घरीच बसविले होते. ज्यांचा मृत्यू झाला ते आजारी नव्हते. मात्र आता शक्य तेवढ्यांना घरी थांबविता येईल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सहआयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी सांगितले.