coronavirus: कोकणात जाण्यासाठीच्या ई-पाससाठी प्रत्येकी पाच हजारांचा रेट, नितेश राणेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 09:26 AM2020-05-25T09:26:44+5:302020-05-25T09:51:44+5:30
जिल्हाबंदीच्या नियमामुळे ई-पास असलेल्यांनाच कोकणातील जिल्ह्यांमध्ये प्रवेश मिळत आहे. त्यामुळे हा ई-पास मिळवण्यासाठी कोकणातील चाकरमान्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई/सिंधुदुर्ग - मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये कोरोना विषाणूच्या फैलावामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बंद झालेली आर्थिक कमाई आणि कोरोनाच्या भीतीमुळे कोकणातील अनेक चाकरमानी गावची वाट धरत आहेत. मात्र जिल्हाबंदीच्या नियमामुळे ई-पास असलेल्यांनाच कोकणातील जिल्ह्यांमध्ये प्रवेश मिळत आहे. त्यामुळे हा ई-पास मिळवण्यासाठी कोकणातील चाकरमान्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्याचाच गैरफायदा घेत ई-पास देण्याच्या कामात एजंटगिरी बोकाळली असून, चाकरमान्यांना ई-पास मिळवून देण्यासाठी या एजंटांकडून पाच हजार रुपयांची दलाली उकळली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नितेश राणे यांनी उघडकीस आणला आहे.
नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट करून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘’ ज्या कोकणातल्या जनतेने शिवसेनेला सगळेच दिले. त्या जनतेला सरकारकडूनच लुटले जात आहे. कोकणात जाण्यासाठीची सरकारी ई-पास, तो पण तीन तासांत मिळत आहे. त्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. या एजंटांना कोणाची मदत आणि आशीर्वाद आहे, याची चौकशी झाली पाहिजे. ही मंडळी स्वत:च्या हिमतीवर हे धाडस करू शकत नाही,’’ असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तसेच ई-पास देण्यामधील एजंटगिरी उघड करणारे ऑडिओ नितेश राणे यांनी ट्विट केले आहेत.
ज्या कोकणातल्या जनतेने शिवसेने ला सगळेच दिले त्या जनतेला सरकारकडूनच लुटले जात आहे!
— nitesh rane (@NiteshNRane) May 24, 2020
सरकारी E pass ते पण 3 तासात..
5000 प्रत्येकी!?
यांना कोणाची मदत आणि आशीर्वाद आहे याची चौकशी झाली पाहिजे!
स्वतःच्या हिंमतीवर हे नाही करू शकत!
तिला अटक करा आणि चौकशी करा! 9029541301 हा नंबर pic.twitter.com/M5IYPOFCyC
दरम्यान, मुंबईत कोरोनाचे संकट गडद होऊ लागल्यापासून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ वाढू लागला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमधील स्थानिक प्रशासनावर ताण येऊ लागला आहे. तसेच मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात कोरोनाग्रस्तांचा आकडाही वाढू लागला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या