coronavirus: क्वॉरंटाइन न होता काढला हॉटेलमधून पळ, उल्हासनगरमधील नागरिकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 04:08 AM2021-04-03T04:08:58+5:302021-04-03T04:09:46+5:30
coronavirus: आफ्रिकेतून परतलेल्या करण उदासी या तरुणाला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन व्हायला सांगण्यात आले होते. मात्र, त्याने तेथून पळ काढत घर गाठले.
मुंबई : आफ्रिकेतून परतलेल्या करण उदासी या तरुणाला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन व्हायला सांगण्यात आले होते. मात्र, त्याने तेथून पळ काढत घर गाठले.
याप्रकरणी त्याच्यावर पालिकेच्या के. पूर्व विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याच्या बहिणीवरही अदखलपात्र गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. हॉटेललाही नोटीस पाठविण्यात आली आहे.
‘हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन व्हायचे नसेल तर १० हजार द्या आणि घरी जा’ असे अंधेरीतील हॉटेल मॅनेजमेंटकडून सांगण्यात आल्याचा आरोप करणारा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी पियू उदासी या तरुणीने व्हायरल केला होता. तिचा भाऊ करण हा आफ्रिकेतून परतल्यामुळे त्याला अंधेरीत साई लीला ग्रँड या हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन होण्यास सांगण्यात आले.
मात्र, तसे न करता, तो थेट उल्हासनगर येथील त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर त्याची बहीण पियू हिने एक व्हिडीओ तयार करुन हॉटेल प्रशासनाने क्वॉरंटाईन व्हायचे नसल्यास १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप व्हिडीओमार्फत केला. याप्रकरणी पालिकेच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांनी करणविरोधात क्वॉरंटाईन मोडल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला तर पियू हिने व्हिडीओमार्फत अब्रुनुकसान केल्याबाबत तिच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
पियूविरोधात हॉटेल व्यवस्थापनाने लेखी तक्रार केली आहे.