मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळीचा चिंतामणीचा पाटपूजन व आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता चिंचपोकळीचा चिंतामणीची उत्सव मूर्तीदेखील न घडविण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आपली धार्मिक परंपरा कायम राखत मंडळाच्या देवाऱ्यातील पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात भक्तांची होणारी गर्दी, पोलीस यंत्रणेवरचा ताण आणि कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता गणेश उत्सवाची परंपरा खंडित न करता मंडळाच्या देवाºयात पुजल्या जाणाºया चांदीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष उमेश सीताराम नाईक यांनी सांगितले.
मंडळ यंदा १०१ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने हे वर्ष ‘जनआरोग्य वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या काळात रक्तदान शिबिर, आरोग्य चिकित्सा, रुग्णसाहित्य केंद्र, शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपकरणे पुरविणे व १०१ कोविड योद्ध्यांचा सन्मान असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.