CoronaVirus मुंबईत चार मृत्यूंची नोंद; २४ तासांत ६८ कोरोना रुग्णांचे निदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 06:42 AM2020-04-07T06:42:23+5:302020-04-07T06:42:42+5:30
रुग्णसंख्या ५२६ वर, बळींची संख्या ३४ वर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या मायानगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव तासागणिक वाढतोय. परिणामी, कोरोनाच्या संसर्गाचा धोका वेळीच ओळखला नाही, तर परिस्थिती आणखी चिंताजनक होणार आहे. मागील २४ तासांत मुंबई शहर उपनगरात ६८ नव्या कोरोना (कोविड-१९) रुग्णांचे निदान झाले असून आता महानगरातील कोरोना बाधितांची संख्या ५२६ वर जाऊन पोहोचली आहे. तर मुंबईत शनिवारी व रविवारी प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहर उपनगरातील मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. सोमवारी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोनामुळे मृत झालेल्या चारही रुग्णांना दीर्घकालीन आजार होता. आतापर्यंत महापालिकेच्या चमूने १५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले असून ६६५ सहवासितांची शोध घेऊन चाचणी करण्यात आली आहे. तसेच घरोघरी १,४०० इतके नमुने पाच चमूंमार्फत एकत्रित करण्यात आले आहे.
या शोध, तपासणी व उपचार अशा त्रिसुत्रींतून तब्बल १३० कोरोना (कोविड१९) रुग्ण सापडले आहेत. एकूण १०,९६८ सहवासितांचे अलगीकरण करण्यात आले आहे. त्यातील ३९९० सहवासितांनी ५ एप्रिलपर्यंत अलगीकरण काळ पूर्ण केला आहे. आजपर्यंत २२६ प्रतिबंधात्मक क्षेत्र शोधले आहेत आणि अद्ययावत करण्यात येत आहेत.
बळींच्या मृत्यूची कारणे
परळ येथील ग्लोबल रुग्णालयात ८० वर्षीय पुरुषाला २९ मार्च रोजी दाखल करण्यात आले. त्यावेळेस, त्या रुग्णाला ताप, श्वसनास त्रास व उच्चरक्तदाब अशा समस्या होत्या. सर्व अवयव निकामी झाल्याने रविवारी सायंकाळी या रुग्णाचा मृत्यू ओढावला. ३ एप्रिल रोजी खासगी प्रयोगशाळेद्वारे त्यास कोरोनाचे निदान झाले होते. जोगेश्वरी ट्रामा रुग्णालयातील ४१ वर्षीय पुरुष २ मार्च रोजी ताप असल्याने दाखल झाला, त्यास मद्यपानाची सवय होती. त्याचा रविवारी सायंकाळी श्वसनाच्या तीव्र समस्येने मृत्यू झाला. १ एप्रिल रोजी खासगी प्रयोगशाळेत त्या रुग्णास कोरोनाचे निदान झाले. याखेरीज, याच रुग्णालयात ६२ वर्षीय पुरुषाला १ एप्रिल रोजी ताप, बेशुद्धावस्थेत उपचारासाठी दाखल केले. या रुग्णाला पक्षाघात, उच्चरक्तदाब व एपिलॅप्सीचा त्रास होता या रुग्णाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने झाला. ३१ मार्च रोजी खासगी प्रयोगशाळेत त्याचे कोरोनाचे निदान झाले होते. तर सेंट जॉर्ज रुग्णालयात ५२ वर्षीय रुग्ण कफ व श्वसनाच्या त्रासामुळे दाखल झाला होता. त्याला मधुमेह होता.
कोविड क्लिनिकमधून ११२ नमुने
प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये संशयित कोविड-१९ रुग्ण शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी डॉक्टर, परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ नेमण्यात आले आहेत. ५ एप्रिल रोजी १० क्लिनिक सुरु करण्यात आले. त्यामध्ये ४६० सहवासितांपैकी १२२ नमुने घेण्यात आले.
बळींचा आकडा वाढताच,
नऊ महिन्यांच्या गर्भवतीचाही मृत्यू
नायर रुग्णालयात नालासोपारा येथील नऊ महिन्याच्या ३० वर्षीय गर्भवतीचा ४ एप्रिलला मृत्यू झाला तर वांद्रे येथील पालिकेच्या भाभा रुग्णालयात सोमवारी सकाळी अंबरनाथ येथील ५० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. या रुग्णाने उत्तर प्रदेशमध्ये प्रवास केला होता आणि त्याला मधुमेहाचाही त्रास होता.
जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात ४१ वर्षीय इसमाचा रविवारी मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. अतिरिक्त मद्यपानामुळे त्याला यकृताचा आजारही होता शिवाय तो अपस्माराचा रुग्ण होता. याच रुग्णालयात ६२ वर्षीय पुरुषाचा ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब, डाव्या अंगाचा पॅरालिसिस हे आजारही होते. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उच्च रक्तदाब असणाऱ्या ८० वर्षीय इसमाचा रविवारी मृत्यू झाला. नवी मुंबई येथील ७२ वर्षीय इसमाचा मुंबईतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि हृदयरोग हे आजारही होते. सेंट जॉर्ज रुग्णालयात ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या दुसºया आठवडयात त्यांनी राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली होती.