Coronavirus: मुंबईत आणखी एक रुग्ण सापडला; राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १९ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:19 PM2020-03-13T23:19:01+5:302020-03-13T23:28:49+5:30
मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे चार रुग्ण सापडले आहेत
मुंबई: कोरोनाची बाधा झाल्यानं उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाच्या पत्नीलादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १९ वर पोहोचली आहे. तर मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ वर गेला आहे. कोरोनाची लागण झाल्यानं काल एका व्यक्तीला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याच्या पत्नीची कोरोना चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
तत्पूर्वी अहमदनगरमध्ये कोरोनाचा एक रुग्ण सापडला आहे. देशातल्या ४० जणांचा एक गट मध्यंतरी दुबईला गेला होता. काही दिवसांपूर्वीच हा गट मायदेशी परतला. या गटातल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातल्या एकाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातली असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे शहरी भागांपाठोपाठ कोरोनानं ग्रामीण भागात धडक दिल्याचं समोर आलं आहे.
नगरमधल्या कोरोना रुग्णाची प्रकृती स्थिर असून अद्याप सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं आढळून आलेली नाहीत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे.
नगर पाठोपाठ मुंबईमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानं राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १९ वर पोहोचली आहे. कोरोनाची बाधा झालेले सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात १० जणांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत कोरोनाचे ४, तर नागपुरात ३ रुग्ण आढळले असून ठाण्यात एक रुग्ण सापडला आहे.