मुंबई - धारावीतील रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांचा आकडाही चारवर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या डॉ. बालिगा नगरमध्ये एका ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा शनिवारी मृत्यू झाला. त्यांच्या ३५ वर्षीय मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, धारावीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ऍक्शन प्लॅन आखण्यात आला आहे. त्यानुसार दहा विशेष पथक बाधित क्षेत्रातील प्रत्येकाची तपासणी करीत आहेत.देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात आतापर्यंत कोरोनाचे २८ रुग्ण सापडले आहेत. दाटीवाटीने उभ्या असलेल्या या लोकवस्तीत साडेआठ लाख नागरिक राहतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या धारावीतील ११ ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच या परिसरातील संशयित रुग्णांना ओळखून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.
मुंबईतील २४ खासगी डॉक्टरांनी मदतीची तयारी दाखवल्यामुळे पालिकेचे बळ वाढले आहे. दोन डॉक्टर, एक आरोग्य केंद्राचा कर्मचारी आणि दोन वैद्यकीय कर्मचारी असे पाचजणांचे पथक असणार आहे. प्रत्येकी दोन पथक अशी दहा पथकं धारावीतील प्रतिबंधित क्षेत्राची तपासणी करणार आहे. हे पथक बाधित क्षेत्रातील लोकांची तपासणी करून ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या नागरिकांना पुढील तपासणीसाठी साई रुग्णालयात पाठवणार आहेत.
असे असेल विशेष पथक...
धारावीतील कल्याण वाडी, मुकुंद, सोशल, मुस्लिम नगर आणि मदिना नगरात कोरोना बाधित रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या तपासणीसाठी प्रत्येकी दोन विशेष पथकं स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामध्ये दोन खासगी डॉक्टर, एक आरोग्य केंद्राचा कर्मचारी आणि दोन वैद्यकीय कर्मचारी असे पाच जणांचे पथक असणार आहे.
स्व संरक्षण उपकरण..पाचशे
मास्क, हातमोजे, ...२००५
थर्मल स्कॅनर...१८
--------------------
जी उत्तर विभाग
विभाग.....रुग्ण....मृत्यू...डिस्चार्ज
धारावी....२८.....०४....१
दादर....११...०....०
माहीम...०५...०१....०
एकूण ४४....०५....०१
---------------------
हाय रिस्क....३३८
लो रिस्क....१२१५
बाधित क्षेत्र.....२१