coronavirus : माणुसकीच्या नात्याने पोलिसानेच केले अंत्यसंस्कार, गृहमंत्र्यांनी केली संवेदनशील पोलिसाची प्रशंसा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 07:14 AM2020-05-16T07:14:39+5:302020-05-16T07:15:12+5:30
मृत व्यक्तीचे आई आणि भाऊ दिल्लीत तर बहीण दक्षिण आफ्रिकेत राहते. लॉकडाउनमुळे आपला भाऊ मृत झाल्याचेही त्यांना पोलिसांद्वारेच कळले.
मुंबई : विरार येथील एका अत्यवस्थ युवकाचा एकाकी मृत्यू झाला. लॉकडाउनमुळे अन्य राज्यातील त्याच्या आईवडिलांसह कोणीच येऊ शकत नव्हते. अखेर मृताची अवहेलना होऊ नये म्हणून पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले. नातेवाईकांना आॅनलाईन दर्शनाची सोय केली. या संवेदनशील कृतीची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: पोलीस नाईक शिंदे यांचे अभिनंदन केले.
मृत व्यक्तीचे आई आणि भाऊ दिल्लीत तर बहीण दक्षिण आफ्रिकेत राहते. लॉकडाउनमुळे आपला भाऊ मृत झाल्याचेही त्यांना पोलिसांद्वारेच कळले. खूप प्रयत्न करूनही लॉकडाउनमुळे पोहचू शकणार नाही. आपणच अंत्यविधी करावेत, अशी नातेवाईकांनी विनंती केली.
शिंदे यांनी यासाठी वरिष्ठांची परवानगी घेऊन कर्तव्यभावनेने अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण केले. मृताचे अंतिम दर्शन व्हिडिओकॉलद्वारे त्यांच्या घरच्यांना दिले. गृहमंत्री अनिल देशमुख यांना ही घटना समजताच त्यांनी स्वत: फोन करून शिंदे यांचे अभिनंदन व कौतुक केले. अशाच प्रकारचे समाजोपयोगी कार्य पुढेही त्यांच्याकडून घडो, अशा शुभेच्छा दिल्या.
केवळ कर्तव्य पार पाडले
मी माझे कर्तव्य केले. परंतु, साहेबांचा फोन आला त्यांनी माझे कौतुक केले. केलेल्या कामाचे समाधान वाटले. खरोखरच थेट गृहमंत्र्यांचा फोन येतो, ही बाब आमच्यासाठी मोठीच, असे शिंदे म्हणाले. मृत व्यक्तीच्या आई आणि बहिणीनेही फोन करून आभार मानल्याचे शिंदे यांनी सांगितले.