मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईत उपलब्ध रुग्णालयांतील खाटांची क्षमता संपली आहे. यामुळे महापालिकेने शाळा, महाविद्यालये, सभागृह, रिकाम्या इमारतींमधील जागा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत गोरेगाव येथील राष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात तब्बल १,२४० खाटांची सोय करण्यात आली आहे.मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४,८७० वर पोहोचली आहे. तर १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या महिनाभरात दुपटीने वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे. केंद्रातून आलेल्या विशेष पथकानेही मुंबईतील जास्तीत जास्त नागरिकांची चाचणी आणि क्वारंटाइन सुविधा वाढविण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी, वरळीप्रमाणे लॉज, सभागृह, पालिका शाळेच्या जागेत खाटा आणि क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात येत आहे.काही दिवसांपूर्वी वरळी एनएससीआयमध्ये पाचशे खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर आता गोरेगाव पूर्व येथील द्रुतगती मार्गाला जोडून असणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात १,२४० खाटांची, आॅक्सिजन सुविधेसह पर्यायी यंत्रणा उभी करण्यात येत आहे. सध्या तीनशे खाटांची यंत्रणा तयार असून उर्वरित खाटांची व्यवस्था मेच्या पहिल्या आठवड्यापूर्वी करण्यात येणार आहे. येथे पाच मोठे हॉल असून दोनशे शौचालये आहेत. येथील सर्व सुविधांची पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी रविवारी पालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
coronavirus : गोरेगाव प्रदर्शन केंद्रात १,२४० खाटांची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 1:41 AM