Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारसोबत; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 02:06 AM2020-04-03T02:06:58+5:302020-04-03T06:38:35+5:30
राज्य सरकारला या समस्येला सामोरे जाण्यासाठी जे काही कठोर निर्णय घ्यावेसे वाटत असतील, ते त्यांनी जरूर घ्यावे.
मुंबई : कोरोनासंदभार्तील परिस्थितीबाबत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि कोरोनाविरुद्धच्या या लढाईत भाजपा राज्य सरकारसोबत आहे, हे आश्वस्त केले. या संकटसमयी आम्ही सारे सोबत आहोत,असे ते म्हणाले.
राज्य सरकारला या समस्येला सामोरे जाण्यासाठी जे काही कठोर निर्णय घ्यावेसे वाटत असतील, ते त्यांनी जरूर घ्यावे. आम्ही भाजपा आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत असे सांगून फडणवीस यांनी रेशन धान्यासंदर्भात नागरिकांच्या समस्या आणि कामगारांचे प्रश्न याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
कोरोनाग्रस्तांची संख्या जेथे सर्वाधिक आहे, अशा महानगर क्षेत्रातील नगरसेवकांशी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधून तेथील समस्या जाणून घेत काय उपाय केले पाहिजे, याबाबत त्यांची मते जाणून घेतली.
फडणवीस म्हणाले की, रेशन दुकानातून धान्य मिळण्याबाबत दोन स्वतंत्र आदेशांमुळे जो परिणाम नागरिकांना भोगावा लागतो आहे तसेच स्थलांतरित तसेच इतरही कामगारांच्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत.
भाजपाचे सेवाकार्य
मंडलांमध्ये काम सुरू ५८७
कम्युनिटी किचन ५६०
तयार अन्न व धान्य वितरण १३ लाख नागरिक
फळे, भाजीपाला वितरण १ लाख नागरिक
रक्तदान ३५० युनिटस
सॅनिटायझेशन 3000
नगरसेवकांकडून (महापालिका आणि नगरपालिका क्षेत्र)
ग्रामीण भागात : चार हजार गावांमध्ये मदतकार्य
डॉक्टर्स आणि वैद्यकीय ३000 अधिकाऱ्यांना मेडिकल किट्स