Join us

coronavirus: मुंबईमधून मोठ्ठा दिलासा देणारी बातमी आली, २४ तासांत तीन महिन्यातील सर्वांत कमी रुग्णांची नोंद झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 4:32 PM

कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या आजाराचा सर्वाधिक फैलाव मुंबईतच झाला होता. मात्र सुरुवातील झालेल्या प्रचंड वाढीनंतर आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी झाली आहे.

ठळक मुद्देसोमवारी मुंबईमध्ये गेल्या १०० दिवसांमधील सर्वात कमी कोरोना रुग्णांची झाली नोंद सोमवारी मुंबईमध्ये केवळ ७०० कोरोनाबाधित रुग्ण सापडले२० ते २६ जुलै या आठवड्यात मुंबईतील कोरोना रुग्णांचा ग्रोथ केवळ १.०३ एवढाच राहिला आहे

मुंबई - देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढली आहे. मात्र असे असले तरी काही दिवसांपर्यंत देशातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईमधून कोरोनाविरोधातील लढाईला मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. सोमवारी मुंबईमध्ये गेल्या १०० दिवसांमधील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी २७ जुलै रोजी मुंबईत एकूण ८ हजार ७७७ कोरोना चाचण्या झाल्या. यामध्ये केवळ ७०० कोरोनाबाधित रुग्ण सापडले. गेल्या १०० दिवसांमध्ये मुंबईल सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा सर्वात कमी आकडा आहे.

तत्पूर्वी रविवारी मुंबईमध्ये कोरोनाचे १ हजार ३३ रुग्ण सापडले होते. दरम्यान, आता मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता वाढून ६८ दिवसांवर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट हा ७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच २० ते २६ जुलै या आठवड्यात मुंबईतील कोरोना रुग्णांचा ग्रोथ केवळ १.०३ एवढाच राहिला आहे.

दरम्यान, सोमवारी संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाच्या ७ हजार ९२४ रुग्णांची नोंद झाली होती. तर २२७ जणांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ६ हजार १३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनाचे एक लाख १० हजार १८२ रुग्ण सापडले असून, आता केवळ २१ हजार ८१२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाणे जिल्ह्यात ३४ हजार ४७१ आणि पुण्यामध्ये ४८ हजार ६७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या आजाराचा सर्वाधिक फैलाव मुंबईतच झाला होता. मात्र सुरुवातील झालेल्या प्रचंड वाढीनंतर आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी झाली आहे. मात्र मुंबईच्या आसपासच्या भागात अजूनही अॅक्टिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनसुद्धा अलर्ट आहे. तसेच रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती प्रशासनाला वाटत आहे.

  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईआरोग्य