Coronavirus : कोरोनामुळे बळावला हात धुण्याचा आजार, मानसिक रुग्णांच्या चिंतेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 01:31 AM2020-03-22T01:31:04+5:302020-03-22T04:20:38+5:30
सर्वसाधारण समाजात दोन ते तीन टक्के लोकांना इलनेस एन्झायटी डिसआॅर्डरने ग्रासलेले असते.
मुंबई : मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या रुग्णांची चिंता कोरोनामुळे वाढली आहे़ मानसोपचार तज्ज्ञांकडील त्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. दिवसातून आठ ते दहा वेळा हात धुण्याचा आजार बळावलेली (आॅब्सेसिव्ह कंम्पल्सिव्ह डिसआॅर्डर-ओसीडी) मंडळी दर तास-दीड तासाच्या अंतराने हात धुण्यासाठी पळू लागली आहेत. आपण आजारी पडू, अशी भावना सतत मनात बाळगणाऱ्यांना (इलनेस एन्झायटी डिसआॅर्डर) कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने पछाडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
सर्वसाधारण समाजात दोन ते तीन टक्के लोकांना इलनेस एन्झायटी डिसआॅर्डरने ग्रासलेले असते. आपल्याला कुठल्या तरी आजाराची लागण होईल, अशी भीती त्यांना कायम असते. कोरोनाची भीती जगभरात पसरल्यानंतर डिसआॅर्डर असलेल्या लोकांमधील अस्वस्थता अधिकच वाढू लागल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांनी दिली. माझ्याकडे उपचारांसाठी येणाºया एका रुग्णातील डिसआॅर्डर (मानसिक अस्वस्थता) गेल्या तीन महिन्यांत नियंत्रणात आली होती. कोरोनाच्या भीतीमुळे ती पूर्वपदावर आल्याचे डॉ. उमाटे यांनी सांगितले.
ओसीडी असलेल्यांचे प्रमाणही साधारणत: पाच टक्के असते. कोणत्याही गोष्टीचा अवास्तव तणाव घ्यायचा त्यांचा स्वभाव असतो. अनेकांना ती सवय लहानपणापासून असते. त्यात आपल्या हाताला काही तरी लागले आहे, असा समज करून ही मंडळी किमान १० ते १२ वेळा हात धुतात, परंतु कोरोनाची धास्ती वाढल्यानंतर त्यांचे हात धुण्याचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी हात धुणे अत्यावश्यकच आहे, परंतु अवास्तव चिंतेपोटी जर हात धुण्याचे प्रमाण वाढले असेल, तर तो एक प्रकारच्या आजाराचाच भाग असल्याचे डॉ. उमाटे यांनी सांगितले. हा आजार असलेल्यांपैकी काही मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारांसाठी जातात, तर बहुसंख्य जण उपचार टाळतात. परंतु गेल्या आठवड्यापासून उपचारास येणाºया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अफवांना बळी पडू नका
कोरोनाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरत असून, त्यामुळे सर्वसामान्य लोकांमधील भीती आणि चिंतेचे प्रमाण वाढू लागल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता, सरकारी यंत्रणांकडून दिल्या जाणाºया सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.