coronavirus: राज्यात हेल्पलाइन क्रमांक केवळ नावालाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:18 AM2020-05-12T06:18:41+5:302020-05-12T06:19:05+5:30
राज्यांतर्गत विविध भागांत अडकलेल्या लोकांना घरी जाता यावे यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली असली तरी त्यासाठी दिलेले हेल्पलाईन क्रमांक केवळ नावालाच आहेत की काय, अशी स्थिती आहे.
मुंबई : राज्यांतर्गत विविध भागांत अडकलेल्या लोकांना घरी जाता यावे यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली असली तरी त्यासाठी दिलेले हेल्पलाईन क्रमांक केवळ नावालाच आहेत की काय, अशी स्थिती आहे. मंत्रालयातील नागरिक संपर्क केंद्राच्या हेल्पलाईनवर संपर्क केल्यानंतर कोरोनाबाबतच्या माहितीचा पर्याय निवडल्यावर केवळ प्रतीक्षा करावी लागते. त्यावर माहिती देण्यास कोणीही उपलब्ध नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या टोल फ्री क्रमांकावरही कोणतेही उत्तर मिळत नाही. या क्रमांकावर केवळ संगीत वाजत राहते.
नमस्कार, नागरिक संपर्क केंद्राशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. कोविड-१९ बाबत माहिती घेण्यासाठी शून्य दाबा, असा संदेश येतो. आपला कॉल आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कृपया प्रतीक्षा करा. आमचे प्रतिनिधी लवकरच उत्तर देतील, असा संदेश ऐकू येतो. मात्र ना फोनवर प्रतिनिधी येतो ना कोविड-१९ बाबत माहिती मिळते, असा अनुभव अनेक नागरिकांना येत आहे. ‘लोकमत’नेही याबाबत खातरजमा केली. नोंदणीसाठी एसटी महामंडळाने आॅनलाईन पोर्टल तयार केले, त्यातही अडचणी आहेत.
एसटीचे पोर्टल धीम्यागतीने
एसटीचे पोर्टल धिम्यागतीने चालत आहे. तसेच पोर्टलवर १८००-२२१-२५० या टोल फ्री क्रमांकावर नागरिक संपर्क साधत आहेत. परंतु, या टोल फ्री क्रमांकावरून कोणतेही उत्तर मिळत नसल्याचा त्यांचा अनुभव आहे.
पालिकेचा असाही अनुभव
प्रवासासाठी वैद्यकीय तपासणी सक्तीची केल्यानंतर पालिकांच्या दवाखान्यांमध्ये शेकडो लोकांनी गर्दी केल्याने आरोग्य तपासणी तडकाफडकी बंद करण्याचा प्रकार डोंबिवली (पूर्व) येथे इंदिरा गांधी चौकातील वॉर्ड आॅफिसने केला. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या १८००२३३४३९२ या टोल फ्री क्रमांकावरही कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.