मुंबई: मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या १ लाखांच्या पुढे गेला आहे. मात्र गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ६८ दिवसांवर आला आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी आणखी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईकरांची हर्ड इम्युनिटी वाढल्याची आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे.मुंबई महानगरपालिका, नीती आयोग आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनं शहरात सेरो चाचणी केली. त्यातील पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी आणि इतर भागांमधील ६ हजार ९३६ जणांचे अहवाल घेण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली. झोपडपट्टी भागातील ५७ टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. तर इतर भागातील १६ टक्के व्यक्तींच्या शरीरात आढळल्या आहेत. मुंबईतील कोरोनाचा विळखा कमी होतोयसोमवारी मुंबईमध्ये गेल्या १०० दिवसांमधील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी २७ जुलै रोजी मुंबईत एकूण ८ हजार ७७७ कोरोना चाचण्या झाल्या. यामध्ये केवळ ७०० कोरोनाबाधित रुग्ण सापडले. गेल्या १०० दिवसांमध्ये मुंबईल सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा सर्वात कमी आकडा आहे.तत्पूर्वी रविवारी मुंबईमध्ये कोरोनाचे १ हजार ३३ रुग्ण सापडले होते. दरम्यान, आता मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता वाढून ६८ दिवसांवर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट हा ७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच २० ते २६ जुलै या आठवड्यात मुंबईतील कोरोना रुग्णांचा ग्रोथ केवळ १.०३ टक्क्यांवर आला आहे.
दरम्यान, सोमवारी संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाच्या ७ हजार ९२४ रुग्णांची नोंद झाली होती. तर २२७ जणांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ६ हजार १३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनाचे एक लाख १० हजार १८२ रुग्ण सापडले असून, आता केवळ २१ हजार ८१२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाणे जिल्ह्यात ३४ हजार ४७१ आणि पुण्यामध्ये ४८ हजार ६७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या आजाराचा सर्वाधिक फैलाव मुंबईतच झाला होता. मात्र सुरुवातील झालेल्या प्रचंड वाढीनंतर आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वेगानं कमी झाली आहे. मात्र मुंबईच्या आसपासच्या भागात अजूनही ऍक्टिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्यानं प्रशासनसुद्धा अलर्ट आहे. तसेच रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती प्रशासनाला वाटत आहे.