CoronaVirus: ‘अरे, ये और काेई नही हमारेही पापाजी हैं’!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 05:49 AM2021-04-24T05:49:24+5:302021-04-24T05:51:44+5:30
‘त्या’ व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीचे कुटुंब आले समोर; अंत्यविधी कुणाचा केला, हा प्रश्न अनुत्तरित
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंत्यविधीसाठी रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेताना अचानक जागे झालेल्या रुग्णाच्या व्हिडिओने खळबळ उडाली. भाजपच्या सुरेश नाखुआ यांनी पालिकेवर टीका करून व्हिडीओ व्हायरल केला. पालिकेने ताे खोटा असल्याचे सांगून नाखुआंविरुद्ध गुन्हाही दाखल केला. त्यातच, ‘अरे ये तो हमारे पापाजी हैं’, असे म्हणत त्यांच्या मुलाने पोलिसांत धाव घेतल्यामुळे या व्हिडिओमागचे गूढ आणखी वाढले आहे. त्यात, वडील समजून कुणावर अंत्यसंस्कार केले, असा प्रश्नही या कुटुंबाला पडला आहे.
व्हिडीओतील व्यक्ती रामसरण गुप्ता असून, ते चेंबूरचे रहिवासी असल्याचा दावा गुप्ता कुटुंबाने केला. रामसरण यांचे जावई राधेश्याम गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २४ जूनला त्यांना न्यूमोनिया झाला म्हणून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे कोरोना झाल्याचे समजताच २७ जून रोजी भाभा कोविड सेंटरमध्ये दाखल केले. २९ जूनला त्यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना कळविण्यात आले. वांद्रा स्मशानभूमीत रामसरन यांच्यावर कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला मृतदेह पाहून संशय आला. मृतदेहाचा चेहरा दाखविण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी नकार दिल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. पाच मुली, दोन मुले असे त्यांचे कुटुंबीय असून वडिलांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला.
अशात ३ दिवसांपूर्वी फेसबुकवरील व्हिडिओ त्यांनी पाहिला. त्यात, स्मशानभूमीत नेताना रुग्णवाहिकेतून उतरवत असताना जागी झालेली व्यक्ती पाहून ते आपलेच वडील असल्याचे या कुटुंबाच्या लक्षात आले. कुटुंबाने सर्व नातेवाइकांना तो व्हिडीओ पाठविला. रेल्वेस्थानक परिसरातही फिरले. दरम्यान, ते आपलेच वडीलच असल्याची खात्री पटताच आपण अंत्यविधी कुणाचा केला, आमचे वडील कुठे आहेत, असे प्रश्न त्यांना पडले. याच्याच चौकशीसाठी मुलगा बिजय गुप्ताने वांद्रे पोलिसांत २१ एप्रिल रोजी लेखी तक्रार अर्ज दिला. पाेलिसांनी सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांच्या मुलीने केली आहे.
याबाबत वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस नितीन कापसे, पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पालिका अधिकाऱ्यांनीही साधला संपर्क
बिजय याला शुक्रवारी वांद्रे पोलिसांनी बोलावून घेतले, तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही त्याच्याशी संपर्क साधला. पोलीस ठाण्यात पालिकेचे कर्मचारीही हाेते, अशी माहिती गुप्ता कुटुंबियांनी दिली.
अधिक चौकशी करणार!
महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, संबंधित रुग्णाचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला होता. अंत्यविधीही करण्यात आला. मृत्यू प्रमाणपत्रही दिले आहे. तरीही याबाबत अधिक चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.