Coronavirus: वांद्र्यात सर्वाधिक मृत्युदर, तर सर्वात कमी कुलाब्यामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 01:14 AM2020-08-26T01:14:12+5:302020-08-26T01:14:24+5:30
महापालिकेने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ८८ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात आला असल्याने महापालिकेने मृत्युदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी केलेल्या विश्लेषणातून मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये दोन टक्के ते सात टक्के एवढा मृत्युदर आढळून आला आहे. सर्वाधिक सात टक्के मृत्युदर एच पूर्व (वांद्रे, खार, सांताक्रुझ पूर्व), बी (डोंगरी), एल (कुर्ला), एम पश्चिम (चेंबूर) या विभागांमध्ये आहे. तर तीन टक्क्यांहून कमी मृत्यूचे प्रमाण कुलाबा, फोर्ट आणि मुलुंड येथे आहे.
महापालिकेने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ८८ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच दैनंदिन रुग्णवाढीचा दरही सरासरी ०.७९ टक्के आहे. तर मुंबईतील मृत्युदराची सरासरी ५.४ टक्के आहे. त्याच वेळी २४ प्रशासकीय विभागांपैकी बहुतांश विभागांतील मृत्युदर मुंबईतील सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्यासाठी ५० वर्षांवरील बाधित रुग्णांची विशेष काळजी घेतली आहे. त्यानुसार अभ्यास करून काही नवीन बदल केले जात आहेत.
या प्रयोगात एखाद्या विभागातील प्रत्येक मृत्यूचे बारकाईने निरीक्षण केले जाणार आहे. के पूर्व विभागात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या विभागात ७० ते ८० टक्के झोपडपट्टी आहे. मात्र येथे आता रुग्णांची संख्या इमारतींमध्ये अधिक आहे. तर सहा लाख लोकसंख्या असलेल्या एच पूर्व विभागात बेहराम पाडा आणि भारत नगर असे झोपडपट्टी विभाग आहेत. तसेच वांद्रे कुर्ला संकुल आणि कलानगर येथील उच्चभ्रू वस्ती आहे. या विभागात मे महिन्यात मृत्युदर आठ टक्के होता.