CoronaVirus News: मुंबईत सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पावणेचार लाख चाचण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 03:18 AM2020-10-06T03:18:06+5:302020-10-06T03:19:32+5:30
CoronaVirus News: सप्टेंबर महिन्यात महापालिकांनी चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्याने आता दररोज १३ ते १५ हजार चाचण्या होऊ लागल्या.
मुंबई : कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर ऑगस्टमध्ये दररोज ११०० - १२०० बाधित रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या महिन्यात रुग्णांची संख्या दुप्पट झाली. चाचण्यांचे प्रमाण वाढविल्यामुळेच ही वाढ दिसून येत असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. आकडेवारीनुसार पावणेचार लाख म्हणजे आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्या सप्टेंबर महिन्यात करण्यात आल्या आहेत.
मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तीन ते चार हजार चाचण्या दररोज केल्या जात होत्या. त्यानुसार जुलैमध्ये दोन लाख चार हजार तर ऑगस्ट महिन्यात दोन लाख ३८ हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र सप्टेंबर महिन्यात महापालिकांनी चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्याने आता दररोज १३ ते १५ हजार चाचण्या होऊ लागल्या. त्यामुळे दररोज दोन हजाराहून अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत महापालिकेने गेल्या सहा महिन्यांत ११ लाख ६८ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ५२ टक्क्यांहून अधिक चाचण्या आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी सर्व विभागाच्या साहाय्यक आयुक्तांना नियोजन करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले आहेत. चाचण्यांचे प्रमाण येत्या काही दिवसांत वाढवून दररोज १८ ते २० हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे.
महिना/चाचणी
३ फेब्रुवारी ते ६ मे -
एक लाख
१ जूनपर्यंत - दोन लाख
२४ जूनपर्यंत - तीन लाख
१४ जुलै - चार लाख
२९ जुलै - पाच लाख
२३ आॅगस्ट - सात लाख
२९ सप्टें.पर्यंत ११ लाख
दररोजच्या चाचण्या
मे ३८७२, जून ४४२२, जुलै ६४००,
आॅगस्ट ७७००, सप्टेंबर १३ ते १५ हजार
खासगी प्रयोगशाळांचाही वापर
महापालिकाबरोबरच मुंबईतील २३ खाजगी प्रयोगशाळांमध्ये दररोज कोरोना चाचण्या केल्या जातात. २४ तासांमध्ये अहवाल देणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीबरोबरच १५ मिनिटांत निदान करणारी अँटिजन चाचणीही केली जात आहे. पालिकेच्या फिरत्या मोबाइल व्हॅनमार्फत संशयित रुग्णांच्या छातीचा एक्स-रे काढण्यात येत आहे.