Coronavirus: कारागृहाच्या मुलाखत कक्षाच्या तटबंदीला छेद; आर्थर रोड जेल संसर्ग होण्यास कारणीभूत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:28 AM2020-05-09T03:28:02+5:302020-05-09T07:23:46+5:30

कस्तुरबा रुग्णालयापासून काही अंतरावर असलेल्या आर्थररोड कारागृहात ३४०० हून अधिक कैदी होते. लॉकडाउनच्या काळात ४०० कैद्यांना तळोजाला हलविण्यात आले.

Coronavirus: hole in the wall of the prison interview cell; Arthur Road Prison Causes Infection? | Coronavirus: कारागृहाच्या मुलाखत कक्षाच्या तटबंदीला छेद; आर्थर रोड जेल संसर्ग होण्यास कारणीभूत?

Coronavirus: कारागृहाच्या मुलाखत कक्षाच्या तटबंदीला छेद; आर्थर रोड जेल संसर्ग होण्यास कारणीभूत?

googlenewsNext

मनीषा म्हात्रे

मुंबई : लॉकडाउन केलेल्या आर्थर रोड कारागृहातील एकाच वेळी ७७ कैदी आणि २६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली असताना, कारागृहाच्या मुलाखत कक्षाची तटबंदीची भींत तोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आतील कर्मचारी घरी ये जा करत असल्याचेही समजते आहे. येथील प्रादुर्भाव वाढण्यासाठी हा मार्ग देखील कारणीभूत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कस्तुरबा रुग्णालयापासून काही अंतरावर असलेल्या आर्थररोड कारागृहात ३४०० हून अधिक कैदी होते. लॉकडाउनच्या काळात ४०० कैद्यांना तळोजाला हलविण्यात आले. तर काहीना जामीन मिळाला. सद्यस्थितीत कारागृहात २८०० कैदी आहेत. त्यामुळे कारागृहातील एका कैद्याच्या उपचारादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच जागे झालेल्या प्रशासनाचे लक्ष कारागृहातील कैद्यांकडे गेले. यात पहिल्या टप्प्यातील चाचणीत ७७ कैदी आणि २६ कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात या कैद्यांना माहुल येथील विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

तर कारागृहाला लॉकडाउन करण्याचे आदेश येताच आर्थर रोड कारागृहातील मुलाखत कक्षाची तटबंदीची भींत तोडण्यात आल्याचे समजते. रोडलगत असलेल्या मुलाखत कक्षाची ही भींत होती. त्यामुळे फक्त कारागृह क्वॉरंटाइन न करता केवळ कैद्याची लाइन क्वॉरंटाइन करण्यात आली होती. पण कर्मचाºयांचा बाहेर ये जा करण्याचा मार्ग मोकळा झाला.

विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या तटबंदीच्या भींतीमुळे कारागृहाला लागून असलेल्या कारागृह कर्मचारी वसाहतीत कर्मचारी ये जा करत होते. त्यामुळे हा प्रादुर्भाव वाढल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत कारागृह अधिक्षक नितीन वायचळ यांना याबाबत विचारताच त्यांनी उत्तर देणे टाळले. तर यापूर्वी दिलेल्या माहितीत त्यांनी कारागृहातील कर्मचारी बाहेर जात नसल्याचे नमूद केले होते. तर कारागृहाचे पोलीस महानिरीक्षक दीपक पाण्डे यांच्याशी वांरवांर संपर्क साधून देखील प्रतिसाद दिलेला नाही.

आर्थररोड कारागृहाने तटबंदीची भींत तोडल्यानंतर भायखळा कारागृह प्रशासनानेही अशाच प्रकारे तटबंदीची भींत तोडण्यास परवानगी द्यावी याबाबत अर्ज केला होता. कारण येथील कर्मचारी वसाहत कारागृहाच्या आवारातच होती. त्यामुळे येथील कर्मचाºयांना घरी
ये जा करण्यास सोपे होईल. मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती असे भायखळा कारागृहातील एका अधिकाºयाने सांगितले.

भायखळा कारागृहातील डॉक्टरला कोरोनाची बाधा
आर्थर रोड कारागृहाने भायखळा येथील विश्रामगृहात पाठविलेल्या दोन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याने येथील कर्मचारी आणि डॉक्टर अशी एकूण ३० जणांची चाचणी करण्यात आली. शुक्रवारी त्यांच्या चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर कैद्याना तपासणाºया डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कारागृह लॉकडाउन केल्याचे जाहीर होताच १० दिवस हे डॉक्टर देखील आतमध्येच होते. कैद्यांना तेच तपासत होते. २५ तारखेला ते कारागृहातून बाहेर निघाले. त्यामुळे ते बाहेर असताना हा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील आकडा ३३ वर
जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा ३३ वर पोहचला आहे. शुक्र वारी ५ नवीन कोरोनाबाधित पोलिसांचा यात भर पडली आहे. या वृत्ताला पोलीस उपायुक्त संग्रामिसंग निशानदार यांनी दुजोरा दिला आहे.

Web Title: Coronavirus: hole in the wall of the prison interview cell; Arthur Road Prison Causes Infection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.