मुंबई : मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या उच्चभ्रूंच्या घरांचे भाव यंदाच्या वर्षांत पाच टक्के आणि पुढल्या वर्षी तीन टक्क्यांनी कमी होतील असा अंदाज आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे जगभरातील सर्वच प्रमुख शहरांमधील मालमत्तांच्या किंमतीत घसरण होणार असून केवळ लिस्बन, मोनाको, व्हिएन्ना आणि शांघाय या जगातील चार शहरांमध्येच निवासी मालमत्तांच्या किंमती वाढतील असे भाकीत या व्यक्त करण्यात आले आहे.
‘प्राईम ग्लोबल रेसिडेंशियल फोरकास्ट’ हा नाईट फ्रँकचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला. त्यात हे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. त्यानुसार, मुंबईतील उच्चभ्रूंची घरे होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जगभरातील २० प्रमुख शहरांमधील २०२० आणि २०२१ सालातील घरांची निर्मिती, त्यांची मागणी, कोरोनाचा प्रभाव आणि या क्षेत्राला सरकारकडून दिली जाणारी मदतीची संभाव्य पॅकेज या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊनच हा अहवाल तयार करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कोरोनामुळे जागतिक स्तरावर मोठी आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे निवासी जागांबाबतचे नेमके भाकीत व्यक्त करणे आव्हानात्मक होते असेही त्यात नमूद आहे. २०१९ आणि २०२० सालातील पहिल्या तिमाहीचा विचार केल्यास मुंबईतील घरांच्या किंमती जेमतेम ०.१ टक्क्यांनी कमी झाल्या होत्या. बंगळूरूत ते प्रमाण १.४ टक्के होते. तर, दिल्लीतल्या किंमती स्थिर होत्या. आर्थिक अस्थैर्य, खालावलेला जीडीपी, बांधकाम पूर्ण झालेल्या परंतु विक्री होऊ न शकलेल्या घरांमुळे बांधकाम व्यवसायावरील ताण वाढला होता. त्यात कोरोनाची भर पडली आहे. २०२० च्या पहिल्या तिमाहीत त्याचे दुष्परिणाम जास्त दिसत नसला तरी पुढील काळात तो वाढत जाईल असा अंदाज आहे.कोरोनामुळे अंदाज चुकलाहे वर्ष सुरू होत असताना या मालमत्तांच्या किंमतीत चांगली वाढ होईल असे भाकीत व्यक्त केले जात होते. मात्र, कोरोनामुळे हे अंदाज चुकले आहेत. २० पैकी १६ शहरांतील मालमत्तांचे दर कमी होतील असे मत नाईट फ्रॅँकचे ग्लोबल हेड लियाम बेली यांनी व्यक्त केले. तर, आर्थिक अरिष्टामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम गृहखरेदीवर दिसेल. मात्र, जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते या क्षेत्राकडे निश्चित आकर्षित होतील असा विश्वास नाईट फ्रँकचे भारतातील अध्यक्ष शिरिश बैजल यांनी व्यक्त केला.