CoronaVirus : पालिकेच्या हेल्पलाईनवर रूग्णालय, रुग्णवाहिकेची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 10:18 PM2020-04-26T22:18:47+5:302020-04-26T22:20:31+5:30
CoronaVirus: पालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर कोरोनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन, त्यांचे शंकेचे निरसन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले.
मुंबई - कोरोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची माहिती आता पालिकेच्या हेल्पलाईनवरही उपलब्ध होणार आहे. त्यानुसार '१९१६' या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर क्रमांक '३' चा पर्याय निवडल्यास 'कोविड' रुग्णांसाठी खाटा उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची माहिती दिली जाणार आहे. तसेच सदर रुग्णालयाला देखील रुग्णाची माहिती दिली जाणार आहे. यामुळे बाधित रुग्णांवर लवकर उपचार सुरू करणे शक्य होणार आहे.
पालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर कोरोनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन, त्यांचे शंकेचे निरसन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. त्याचबरोबर आता रुग्णालयांची माहिती देण्याची सुविधाही पालिकेने उपलब्ध करून दिली आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून नंबर '१' चा पर्याय निवडल्यास 'कोरोनाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन संबंधितांना देण्यात येते. या मार्गदर्शनादरम्यान डॉक्टरांना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय चाचणी गरजेची आहे असे वाटल्यास, त्यांना त्यांच्या घराजवळच्या वैद्यकीय प्रयोगशाळेचा संपर्क क्रमांक देण्यात येतो.
संबंधित व्यक्तीचे विलगीकरण गरजेचे असल्यास त्याबाबतही संबंधितांना दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. विविध रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांसाठी असलेल्या खाटांपैकी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती नियमितपणे अद्ययावत केली जात आहे. लवकरच ही माहिती 'रियल टाईम' पद्धतीने देखील अद्ययावत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच यासाठी 'बुक माय शो'सारख्या खाजगी संस्थांची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर यांनी सांगितले.
अशी मिळणार हेल्पलाईनवर मदत...
- ज्या व्यक्तींना रुग्णवाहिकेची गरज आहे, त्यांनी '१९१६' या क्रमांकावर संपर्क साधून नंबर '२' असा पर्याय निवडल्यास रुग्णवाहिका दूरध्वनी क्रमांकाशी समन्वय साधून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- कोरोना संबंधित बाबींव्यतिरिक्त पालिकेशी संबंधित नागरी सेवा सुविधासाठी १९१६' या क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी नंबर '४' हा पर्याय निवडावा लागणार आहे.