हॉटेलमधील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात; परराज्यातील १४ लाख कामगारांना परत आणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 03:49 AM2020-08-27T03:49:11+5:302020-08-27T03:50:05+5:30
एसटी वाहतूक सुरू झाल्याने मिळाला दिलासा
मुंबई : कोरोनामुळे हॉटेलमध्ये काम करणारे १४ लाख राज्याबाहेरील कर्मचारी परत गेले आहेत. याशिवाय राज्यातील दोन ते तीन लाख कर्मचारीही परत गेले आहेत.
परंतु राज्यातील एसटी वाहतूक सुरू झाली आहे त्यामुळे राज्यातील कामगार परत येत आहेत, असे आहारच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, हॉटेल सुरू केले आहे पण रेस्टॉरंट बंद आहे. रेस्टोरंट सुरू करण्यात यावी तसेच घोषणा करण्यापूर्वी रेस्टॉरंट चालकांना सूचना द्यावी, कारण सुरू करण्याची तयारी करण्यासाठीही १५ ते २० दिवस जातील, असे आहारने म्हटले आहे. याबाबत आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, कोरोनामुळे राज्यातील हॉटेल व्यवसायातील १४ लाख कर्मचारी आपल्या राज्यात परत गेले आहेत. ते ओडिशा, उत्तर प्रदेश, बिहार आदी ठिकाणांवरून येतात.
तर दोन ते तीन लाख कर्मचारी राज्यातील विविध भागांतील आहेत. अहमदनगर, नाशिक, अमरावती, जालना आदी ठिकाणांहून येतात. कोरोनाच्या भीतीने कामगार घरी गेले आहेत, पण त्यांच्यापुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. राज्यातील वाहतूक सुरू झाल्याने कामगार येत आहेत. विविध भागांतून हे कर्मचारी येत असून गणपती विसर्जन झाल्यानंतर मोठ्या संख्येने कामगार परत येतील. पण ते कामावर आल्यानंतर रेस्टॉरंट बंद असतील तर काम करणार कसे, हा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा रेस्टॉरंट बंद पडतील असेही ते म्हणाले. राज्याबाहेरील कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्यासाठी रेल्वेगाड्या नाहीत. सरकारने या कामगारांसाठी रेल्वे गाड्यांची व्यवस्था करावी. दोन ते तीन लाख कर्मचारी राज्यातील विविध भागातील आहेत.