Coronavirus: कोरोना राक्षस हरणार कसा?; लोकांची सुरक्षा मास्क भरोसे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 02:35 AM2020-08-24T02:35:07+5:302020-08-24T02:35:18+5:30
पूर्वी कंटेनमेंट झोन केले तर त्याचा बॅनर लावण्यात येत नव्हता. एखाद्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास त्या इमारतीला किंवा घराचे निर्जंतुकीकरण करण्यात येते.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचा दावा केला जात असला तरी कंटेनमेंट झोन्स आणि सील्ड इमारतींची संख्या मात्र कमी झालेली नाही. आजघडीला मुंबईत ५८१ कंटेनमेंट झोन्स असून, सील्ड इमारतींची संख्या ५ हजार ५०४ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंटेनमेंट झोन्स आणि सील्ड इमारत परिसरात कोरोनाला हरविण्यासाठीच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. नियम पाळणे गरजेचे आहे. बाजारात कमी गर्दी करणे आवश्यक आहे. मात्र यातील बहुतांश नियमांना बगल देण्यात येत असून, नियम आणि सूचना नावाला पाळल्या जात आहेत. परिणामी नियमांचे उल्लंघन केले तर कोरोनाचा संसर्ग आटोक्यात कसा येणार, असाही सवाल उपस्थित झाला आहे.
मुंबईत सर्वाधिक कंटेनमेंट झोन्स कुर्ल्यात असून, हा आकडा ५७ आहे. त्याखालोखाल भांडुप आणि दहिसर येथे ५४ झोन्स आहेत. अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले येथे ४० ते ४४ झोन्स आहेत. तर सर्वात कमी झोन्स डोंगरी, वरळी, परळ, वांद्रे परिसरात आहेत. मुंबईतल्या ५८१ झोन्समध्ये एकूण ९ लाख २५ हजार ४१९ घरे आहेत. येथील एकूण लोकसंख्या ३९ लाख ७० हजार ७६२ एवढी आहे. या सर्व झोन्समधील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ४७५ एवढी आहे. दुसरीकडे मुंबईत एकूण ५ हजार ५०४ इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतींमधील एकूण घरांची संख्या २ लाख १७ हजार ४९५ आहे. एकूण लोकसंख्या ७ लाख ९१ हजार ४९४ आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २३ हजार २९७ आहे. बोरीवली येथे सर्वाधिक सील्ड इमारती असून, हा आकडा ५५२ आहे. तर अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व आणि विलेपार्ले येथे ५५१ इमारती सील असून, डोंगरी परिसरात ५० इमारती सील आहेत.
लोकांची सुरक्षा मास्क भरोसे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोन करण्यात आले. आता कंटेनमेंट झोनची संख्या कमी झाली आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळताही नागरिक बिनधास्त वागत आहेत. मास्क घालून बाजाराच्या ठिकाणी कित्येक जण गर्दी करत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चेंबूर मार्केटमध्ये ग्राहक गर्दी करत आहेत. पूर्वी सम-विषम नियम होता तेव्हा गर्दी कमी होती. दुकानदारही रांगेत सोशल डिस्टन्सिंग पाळून विक्री करत होते. पण आता सर्व दुकाने खुली असल्याने दुकानदार सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच एखाद्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास नागरिक खूप काळजी घेत होते, पण आता गांभीर्याने घेत नाहीत, बिनधास्त वावरत आहेत.
पूर्वी कंटेनमेंट झोन केले तर त्याचा बॅनर लावण्यात येत नव्हता. एखाद्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास त्या इमारतीला किंवा घराचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. पूर्वीप्रमाणे बॅनर लावण्यात येत नाही. तसेच मध्यमवर्गीय व्यक्ती, वृद्ध मास्कची काळजी घेतात. पण तरुण मास्ककडे दुर्लक्ष करत आहेत. - सुभाष मराठे, सामाजिक कार्यकर्ते
एम वॉर्ड पश्चिममध्ये पूर्वी २१ कंटेनमेंट झोन होते. आता हा आकडा आठवर आला आहे. तसेच कंटेनमेंट झोनमधून कोरोनाचे रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोनाचे रुग्ण मिळाल्यानंतर निर्जंतुकीकरण करण्यात येते आणि बॅनर लावण्यात येते. तसेच जे नागरिक मास्कचा वापर करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. - पृथ्वीराज चव्हाण, सहायक आयुक्त, एम पश्चिम विभाग
पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
1)कुर्ला, घाटकोपर, धारावी, अंधेरी, साकीनाका, बैलबाजार, कमानी, सोनापूर लेन, कुर्ला रेल्वे स्थानक परिसर आणि बाजार परिसर, कमानी जंक्शनसह साकीनाका जंक्शन येथील परिसर, जरीमरी येथील परिसर या पूर्व उपनगरातील अनेक परिसरांमध्ये विशेषत: बाजारपेठांमध्ये सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजले आहेत.
2)सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परिसरात बहुतांश वेळा मोठी वर्दळ असते. अशा वेळी सामाजिक अंतर पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र येथे ते पाळले जात नाही.
3)दरम्यान, या सर्व परिसरात सायंकाळी ७ वाजता पोलीस दाखल होतात आणि खुली असलेली दुकाने वेळेत बंद करण्याचे आवाहन करतात. अशा वेळी नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला जातो. वेळेत दुकाने खुली केली जातात आणि बंदही केली जातात.
पश्चिम उपनगर आता सावरतंय
1)मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गेले पाच महिने पालिका प्रशासनाने घेतलेली अविरत मेहनत आणि कोरोनामुक्त रुग्ण होण्यासाठी केलेले ठोस प्रयत्न यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर मुंबईत कोरोना रुग्णांच्या दुपटीचा कालावधी हा आता ८६ दिवसांवर गेला आहे. पालिका प्रशासनाने कोविड १९चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अमलात आणलेल्या विविध उपाययोजनांमुळे आणि कोरोना रुग्णांच्या युद्धपातळीवर केलेल्या शोधमोहिमेमुळे पश्चिम उपनगरात कंटेनमेंट झोनची संख्याही कमी होत असल्याचे चित्र आहे.
2)पश्चिम उपनगरातील परिमंडळ ७ मध्ये झोपडपट्टीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी असताना त्या तुलनेत इमारतींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे ही वस्तुस्थिती आहे. जर एखाद्या इमारतीत तीनपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले तर ती इमारत सील करण्यात येते. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना अत्यावश्यक सेवा मिळण्यासाठी येथील एक रस्ता बंद करून बाकीचे रस्ते सुरू ठेवण्यात येतात. तर झोपडपट्टीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असेल तर ती झोपडपट्टी सील करण्यात येते.
3)कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व अतिधोका असणाºया रुग्णांना कोविड केअर सेंटर १ (सीसीसी १) मध्ये ठेवण्यात येते, तर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ५० वर्षांच्या आतील रुग्णांना कोविड केसर सेंटर २ (सीसीसी २) मध्ये ठेवण्यात येते. तर डीसीएचसी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) मध्ये कोविड रुग्णांसाठी आॅक्सिजन आणि अन्य सुविधा उपलब्ध असून पश्चिम उपनगरात बीकेसी तसेच गोरेगाव पूर्व नेस्को आणि दहिसर कांदरपाडा येथे ही सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांसाठी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या बाधित व्यक्तींसाठी पालिकेतर्फे मोफत व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांची लोकसंख्या कमी होत असल्याने पश्चिम उपनगरातील अनेक कोविड सेंटरमध्ये अनेक बेड रिकामे आहेत़