मुंबई - महापालिकेने कोविड रुग्णांवर मिश्रित औषधोपचार पद्धती प्रायोगिक तत्त्वावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात सुरू केली आहे. आतापर्यंत २१२ कोविड बाधितांना हे मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्यात आले. यापैकी १९९ रुग्णांचे उपचारअंती निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही रुग्णावर या मिश्रित औषधांचे प्रतिकूल परिणाम आढळलेले नाहीत. (This is how the experiment of increasing antibodies in covid patients took place)
या १९९ रुग्णांमध्ये १८ ते ४५ वर्ष वयोगटातील १०१ रुग्ण, ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील ४५ रुग्ण तर ६० वर्ष वयोगटावरील ५३ रुग्णांचा समावेश आहे. एकूण १९९ पैकी ७४ जणांना किमान एक तरी सहव्याधी आहे. हे सर्व १९९ रुग्ण सौम्य ते मध्यम बाधा या गटातीलच होते. उपचार सुरु करतेवेळी या यापैकी १७९ जणांना ताप, १५८ जणांना तापासह खोकला किंवा ताप नसला तरी खोकल्याचा त्रास होत होता. तसेच चार रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करावा लागणार होता.
एचआरसीटी चाचणीनुसार रुग्णांचा सरासरी एचआरसीटी स्कोअर २५ पैकी ७ ते ८ इतका होता. सर्वाधिक एचआरसीटी स्कोअर २५ पैकी ११ इतका होता. उपचारांनंतर काढलेल्या निष्कर्षांनुसार कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रण देण्यात आलेल्या बाधितांना रुग्णालयात पाच ते सहा दिवसांचे उपचार घ्यावे लागले. त्या तुलनेत इतर औषधी घेतलेल्या, पहिल्या व दुसऱया लाटेतील रुग्णांना १३ ते १४ दिवस रुग्णालयात राहावे लागत होते. रुग्ण लवकर बरे होत असले तरी औषधांचे परिमाण अभ्यासण्यासाठी, रुग्णांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्याकरता त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. असा आहे प्रयोगाचा निष्कर्ष....मिश्रित औषध दिल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच रुग्णांना ताप येणे थांबले. १९९ पैकी फक्त एकाच व्यक्तीला पुढे प्राणवायू पुरवठा करावा लागला. हे प्रमाण अवघे ०.५ टक्के आहे. पहिल्या व दुसऱया लाटेमध्ये किमान २० टक्के रुग्णांना प्राणवायू द्यावा लागत होता. तर पाच टक्के रुग्णांना अतिदक्षता उपचार पुरवावे लागत होते. या औषधांचे साइड इफेक्ट नसून मृत्यूंचे प्रमाण तब्बल ७० टक्क्यांनी घटले आहे.