CoronaVirus: पोलिसांना देणार एचसीक्यूएसच्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:50 AM2020-04-25T05:50:15+5:302020-04-25T05:50:49+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न
मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेड झोन, नाकाबंदी, कोव्हिड रुग्णालयांसह जिथे सर्वाधिक सामान्य नागरिकांशी संपर्क येतो अशा ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई पोलिसांना एचसीक्यूएसच्या गोळ्या देण्यात येतील. एकाच वेळी सर्वांनी या गोळ्या नियमित घ्याव्यात यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप बनविण्याच्या सूचना पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गुरूवारी दिल्या.
राज्यभरात कोरोना बाधित पोलिसांचा आकडा ६४ वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाच्या वैद्यकीय पॅनलवर असलेले डॉक्टर संजय कपोते यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांना एचसीक्यूएसच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त कार्यालयातून गोळ्या उपलब्ध करून देण्यात येतील.
गोळ्यांच्या सेवनाबाबत माहिती द्यावी. या गोळ्या घेण्यासाठी शक्यतो एकच वार निश्चित करावा, जेणेकरून व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे गोळ्या घेण्यासाठी पोलीस निरीक्षक (प्रशासन) आठवण करून देतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गोळ्या घेणे ऐच्छिक आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.