CoronaVirus: भारताकडून जगभरात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा; पण बीएमसीत औषधाचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 10:54 AM2020-04-11T10:54:17+5:302020-04-11T10:56:08+5:30
coronavirus कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन मिळेना
मुंबई: कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जगातील अनेक देशांनी भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मागणी केली. यानंतर भारतानं अमेरिकेसह अनेक देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन निर्यात करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताकडून जगभरात पाठवलं जाणारं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन मुंबईतल्या सरकारी रुग्णालयांमधल्या कित्येक कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस घेणं गरजेचं आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या कित्येक रुग्णालयांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. कोरोना रुग्णांच्या थेट संपर्कात येणारे पालिका रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी आणि काही रुग्णांचे नातेवाईक यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र त्यांना हे औषध पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अनेक कर्मचाऱ्यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या तिसरा डोस घेता येत नसल्याची माहिती सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरनंच दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
अमेरिकेकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनला मागणी असल्यानं औषधाची साठवणूक केली जात असावी, अशी शंका एका अधिकाऱ्यानं बोलून दाखवली. यावर पालिका प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अधिकाऱ्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.