Join us

coronavirus : मला राजकारण करायचं नाहीये, करणाऱ्यांना करू द्या! उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 4:56 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण करत असलेल्या भाजपाला नाव न घेता टोला लगावला.

ठळक मुद्देमी राजकारण बाजूला ठेऊन कोरोनाविरोधात लढत आहे. मात्र काहीजणांकडून राजकारण केले जात आहेही वेळ राजकारण करण्याची नाहीसध्या कोरोनाच्या लढाईत लढण्याला माझा प्राधान्यक्रम आहे

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच सणवार घरात बसून साजरे केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण करत असलेल्या भाजपाला नाव न घेता टोला लगावला. मी राजकारण बाजूला ठेऊन कोरोनाविरोधात लढत आहे. मात्र काहीजणांकडून राजकारण केले जात आहे. मला त्या फंदात पडायचे नाही, असे ते म्हणाले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यादृष्टीने आम्ही तयारी केली आहे. मात्र याबाबतीतही राजकारण काही जणांकडून राजकारण केले जात आहे. पण ही वेळ राजकारण करण्याची नाही. मी राजकारण बाजूला ठेऊन या लढाईत लढतो आहे. मी या फंदात पडत नाही, सध्या कोरोनाच्या लढाईत लढण्याला माझा प्राधान्यक्रम आहे. 

याबाबतीत मी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानायचे आहेत. नितीनजी आपले लाख लाख धन्यवाद. कोरोना विरुद्धच्या लढाईत राजकारण करणाऱ्या काहींना नितीन गडकरी यांनी चांगला सल्ला दिलाय. ही वेळ राजकारण करायची नाही, हे नितीनजींनी सांगितलंय. त्यामुळे मला त्यांचे आभार मानावे वाटतात, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

 काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना नितीन गडकरींनी अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांना सल्ला दिला होता. कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये, असे गडकरी यांनी म्हटले होते.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारभाजपा