Coronavirus: कब्रस्थानांमध्ये निर्जंतुकीकरण प्रणाली बसविण्याचा विचार; पालकमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:38 AM2020-05-07T01:38:00+5:302020-05-07T01:38:14+5:30
जगभरातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि सरकारांनी मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरणाच्या प्रयत्नांना प्राधान्य दिले आहे.
मुंबई : कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईतील कब्रस्थानांमध्ये निर्जंतुकीकरण प्रणाली बसविण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री व मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्थानचे व्यवस्थापक शोहेब खतिब व अन्य ट्रस्टींसोबत त्यांनी नुकताच एक दौरा केला होता.अस्लम शेख म्हणाले की, देश-विदेशात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. स्वच्छता हा यातील महत्त्वाचा भाग आहे. आघाडीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था विस्तीर्ण सार्वजनिक जागांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सोयीस्कर आणि प्रभावी पद्धतींवर लक्ष केंद्रित करत आहेत. जगभरातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि सरकारांनी मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरणाच्या प्रयत्नांना प्राधान्य दिले आहे. हे करण्यामागचे कारण म्हणजे रासायनिक जंतुनाशकांमुळे कोरोना विषाणू सहजपणे
निष्क्रिय होतो.
रुग्णालये, बसस्थानके, रिक्षा स्टँड, इमारती, रेल्वे स्थानके, उद्याने व विस्तीर्ण जागांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी नवनवीन निर्जंतुकीकरण प्रणाली देशभरामध्ये विकसित केल्या जात असताना कब्रस्थाने व स्मशानभूमींमध्ये निर्जंतुकीकरण प्रणाली बसविणे, तसेच या ठिकाणी येणाऱ्या मृतकांचे नातेवाईक व परिजनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असल्याचे अस्लम शेख शेवटी म्हणाले.