Join us

Coronavirus: सर्व ठिक झालं तर लवकरच कोरोनावर औषध मिळणार; भारतीय औषध कंपनीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 1:04 PM

श्वास घेण्यास त्रास, अँटी फ्लू आणि एचआयव्हीच्या संबंधित समस्यावर उपचारामध्ये सिप्लाचं योगदान महत्त्वपूर्ण आहे.

ठळक मुद्देसर्वोतोपरी संशोधन देशाच्या फायद्यासाठी करणं हे राष्ट्रीय कर्तव्य मानतोकोरोनावर औषध शोधण्याचे सिप्ला कंपनीकडून संशोधनसिप्लाचा दावा खरा ठरला तर कोरोनावर औषध बनवणारी पहिली भारतीय कंपनी असेल

मुंबई – कोरोना व्हायरसचा सामना जगातील बहुतांश देश करत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे ११ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर औषध शोधण्याचे प्रयत्न अमेरिका, चीनसह भारतातील कंपन्याही करत आहेत. अशातच खोकला, सर्दी अशा अनेक आजारांवर औषध बनवणाऱ्या भारतीय कंपनीने पुढील ६ महिन्यात कोरोनावर औषध आणण्याचा दावा केला आहे.  

सिप्ला असं या औषध कंपनीचं नाव आहे. जर या कंपनीचा दावा खरा ठरला तर कोरोना व्हायरसवर औषध शोधणारी ही पहिली भारतीय कंपनी असेल. ही कंपनी सरकारी प्रयोगशाळांच्या सहाय्याने कोरोनावर औषध शोधण्याचं संशोधन करत आहे. या आजारात श्वास घेण्यास त्रास, दमा, एंटी वायरल तसेच एचआयव्हीची औषध यांचा वापर करुन औषध शोधण्याचा प्रयत्न आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असून सध्या भारतात २५९ रुग्ण आढळून आले आहेत.

सिप्लाचे प्रमोटर युसूफ हामिद यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, आम्ही सर्वोतोपरी संशोधन देशाच्या फायद्यासाठी करणं हे राष्ट्रीय कर्तव्य मानतो. सिप्लाने स्विझरलँड येथील रोचेज एक्टेमरा औषध भारतात पहिलं वितरीत केलं आहे. ज्याचा वापर फुफ्फुस्साच्या रोगासाठी केला जातो. जर भारतीय वैद्यकीय क्षेत्राने निर्णय घेतला तर कंपनीकडे अधिक औषधे आहेत, त्याचा वापर केला जाऊ शकतात.

श्वास घेण्यास त्रास, अँटी फ्लू आणि एचआयव्हीच्या संबंधित समस्यावर उपचारामध्ये सिप्लाचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. सध्या, ही औषधे कोरोनाच्या बाबतीत प्रभावी सिद्ध होऊ शकतात. आता कोविड -१९ चा इलाज नाही, पण एचआयव्ही, अँटी-व्हायरल आणि मलेरियाविरोधी औषधांचा वापर कोरोनाविरोधात केला जाऊ शकतो.

कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी फेविपीरावीर, रेमिडेसिव्हिर आणि बोलेक्सावीर सारख्या अँटी-व्हायरलचं उत्पादन सुरु केलं जाईल. 'सरकारी प्रयोगशाळांसह या तीन औषधांसाठी कच्चा माल कसा बनवायचा याचा आम्ही विचार करीत आहोत. कच्चा माल तयार केल्यावर औषध मिळण्यास सहा महिने लागतील असं हमीद यांनी सांगितले आहे.

तसेच आमच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारची औषधे आहेत, परंतु कोणतं मिश्रण यावर काम करु शकेल हे सांगता येत नाही. हे डॉक्टरांच्या निर्णयावर अवलंबून असते. कोरोनावर उपचारासाठी सध्या ज्या औषधांचा वापर होत आहे त्याचे चांगले परिणाम दिसत आहे. त्यांची चाचणी घेण्यात येत आहे त्यात अँटीवायरल ड्रग रेमिडेसिव्हिर, दोन एचआयव्ही औषधे - लोपिनवीर आणि रीटोनाविर आणि मलेरिया विरोधी औषध क्लोरोक्विन यांचा समावेश आहे. अशीही माहिती त्यांनी दिली. सिप्लाने लोपिम्यून टॅब्लेट बनवलं आहे. जे लोपिनावीर आणि रिटोनाविर यांचे मिश्रण आहे. आमच्याकडे औषधांचा साठा उपलब्ध आहे. पण कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत गेला तर कठीण परिस्थिती निर्माण होईल अशी भीती सिप्लाने व्यक्त केली.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याऔषधं