Coronavirus : कोरोनाला थोपविण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधन केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 03:57 PM2020-04-04T15:57:34+5:302020-04-04T15:57:56+5:30
Coronavirus : केंद्राच्या डीएसटी विभागाकडून स्टार्टअप्स व संशोधकांच्या संशोधनाना मिळणार पाठबळ
मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी , त्यांच्यावर अभिनव कल्पना लढविणाऱ्या स्टार्टअप उद्योगांचा शोध घेणे, त्यांचे मूल्यमापन करणे व त्यांना पाठबळ देणे यासाठी सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड -19 हेल्थ क्रायसिस केंद्राची (जलद प्रतिसाद केंद्राची) स्थापना केंद्राच्या विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून आयआयटी बॉम्बेमध्ये 56 कोटी रुपये खर्चून करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांत कोविड 19 शी मुकाबला करू शकणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेणे आणि ते उपयोगात आणणे हे या केंद्राचे महत्त्वाचे उद्दिष्ट असणार आहे. यासाठी आयआयटी बॉम्बेची साइन (सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड इन्ट्रप्रेनारशीप ) ही संस्था मध्यवर्ती भूमिका बजावणार आहे.
देशात आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असता, विविध संशोधन संस्था व प्रयोगशाळांमध्ये या रोगावर तोडगा शोधण्याचे प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. कोविड -19 ची पुढे आणखी वाढ होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी या प्रयत्नांना जोड देण्यासाठी व त्यांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी तातडीची पावले उचलली आहेत. केंद्राच्या विज्ञान व माहिती तंत्रज्ञान केंद्राची ही स्थापना त्याचाच एक भाग आहे. कोविड -19 च्या नियंत्रणासाठी व्हेंटीलेटर्स,निदान व उपचार प्रणाली, माहिती प्रणाली अशा प्रकारच्या उपायांमध्ये विविध संशोधन करणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचे काम हा विभाग करत आहे.
व्हेंटिलेटर्स , मास्क अशा त्या-त्या उत्पादनांची व्यापारी तत्त्वावर जलद निर्मिती व विविध राज्यांत ती उत्पादने पोहोचविण्यासाठीचे प्रयत्न याकरिता स्टार्टअप उद्योगांना जे जे पाठबळ आवश्यक आहे ते याद्वारे पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या 6 महिन्यात अशी नवीन संशोधने आणि अभिनव उत्पादने बाजारात आणू शकणाऱ्या सक्षम स्टार्टअप उद्योगांना आर्थिक मदत आणि निधी उपलब्धता करून देण्यासाठी हे केंद्र उभारले असून ते या स्टार्टअप्ससाठी कवचसारखे काम करणार आहे.
नवीन प्रकारचे, स्वस्त, सुरक्षित आणि परिणामकारक असे व्हेंटीलेटर्स, श्वसन-सहायक यंत्रणा, व्यक्तिगत सुरक्षा सामग्री, तसेच, सॅनिटायझर्स, जंतुनाशक औषधे, निदान प्रणाली इत्यादींचे नवे पर्याय शोधणारे ५० संशोधन संस्था आणि स्टार्टअप उद्योग याद्वारे निवडले जाणार आहेत. या केंद्रामुळे अशा प्रकारची कोविड -19शी मुकाबला करणारी उत्पादने बनवण्यापासून सदर उत्पादनांच्या चाचण्यांपासून ती बाजारात उतरवेपर्यंतची कामे करणाऱ्या संशोधकांना देशभरच्या संस्थांच्या नेट्वर्कशी यामुळे संपर्क साधता येणार आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठीची तरुणाईची ऊर्जा, बुद्धिमत्ता, अभिनव क्लृप्त्या लढविणाऱ्या तंत्रज्ञान विषयक उदयोन्मुख कंपन्या आणि स्टार्टअप हे यामुळे एकत्र येतील आणि त्यांच्या प्रयत्नांना वेग देण्यावर केंद्राचा भर असेल अशी प्रतिक्रिया विज्ञान व माहिती तंत्रज्ञानचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! दिल्लीतील तब्बल 108 डॉक्टर आणि नर्स क्वारंटाईन
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय
Coronavirus : कोरोना हेल्मेट पाहिलंत का?, जनजागृतीसाठी 'त्याने' लढवली अनोखी शक्कल
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार
Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर