मुंबई - सध्या देशात लॉकडाऊनची परिस्थिती पाहता अनेक गरजू व्यक्तींना विविध प्रकारच्या मदतींचा ओघ विविध संघटना, डॉक्टर्स आणि व्यक्तीगतरीत्याही सुरू आहे. मात्र या परिस्थितीत काही नवजात बालकांना जन्म देणाऱ्या अनेक मतांच्या समस्याही प्रामुख्याने पुढे आल्या आहेत. नुकत्याच जन्म दिलेल्या बाळांच्या संदर्भातील अनेक अडचणी, मार्गदर्शन या माता प्रत्यक्ष डॉक्टरांना न भेटल्याने या मातांच्या पुढे उभ्या आहेत. अशा मातांच्या अडचणी लक्षात घेऊन आयआयटी बॉम्बेकडून मा और शिशु पोषण हेल्पलाईन या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक मातांना आपल्या नवजात बालकांसाठी काय योग्य, अयोग्य, मार्गदर्शन, सल्ले यांसाठी तज्ज्ञांची मदत मिळू शकणार आहे.
केंद्राच्या मानव संसाधन विकास विभाग आणि व्हील्स फाउंडेशनची मदत आयआयटी बॉम्बेच्या या उपक्रमाला मिळाली आहे. हा हेल्पलाईन क्रमांक हिंदी, मराठी, इंग्रजी, तामिळ आणि गुजराती भाषांमध्ये उपलब्ध आहे. स्तनपान, कमी वजनाची मुले, प्री मॅच्युअर बेबी, स्तनदा मातेचा आहार अशा अनेक बाबतीत या क्षेत्रातील 10 वर्षांहून अधिकचा अनुभव असलेले तज्ज्ञ या हेल्पलाईनद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.
मास्क आणि ग्लोव्हजची मदत
हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मास्क आणि ग्लोव्हजच्या तुटवड्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयआयटी बॉम्बेतील विद्यार्थ्यांनी विविध विभागातून तब्बल ७ हजार ६०० ग्लोव्हज आणि २ हजार ९९० मास्क जमा करून पालिका हॉस्पिटलला दान दिले आहेत.
आयआयटी बॉम्बेच्या ऑफिस ऑफ डीन स्टुडंट अफेअरच्या विद्यार्थ्यानी आयआयटीतील विविध विभागातून मास्क आणि ग्लोव्हज जमा करण्यास सुरुवात केली. या मोहिमेत स्टुडंट टास्क फोर्सचे सदस्य राधिक राममोहन, अक्षय नायर, गुरप्रित सिंग, यांच्याबरोबर इलेक्ट्रिक इंजिनियरिंग विभागातील भाव्या के. आणि अश्विनी जी हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वीच या मोहिमेला सुरुवात केली होती. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत लॅब व विभागामधील ग्लोव्हज आणि मास्क उपलब्ध करून दिले. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत मास्क शिवून विद्यार्थ्याना दिले. या उपक्रमाअंतर्गत अवघ्या काही दिवसांत विद्यार्थ्यानी तब्बल ७ हजार ६०० ग्लोव्हज आणि २ हजार ९९० मास्क जमा केले.
त्यानंतर विद्यार्थ्यानी मुंबई पालिका हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. रमेश भारमल आणि पालिकेच्या आरोग्य विभागाचे आयुक्त यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत जमा केलेले मास्क आणि ग्लोव्हज मदत म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली. पालिकेने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने मास्क व ग्लोव्हज नेण्याची व्यवस्था करत 30 मार्चला सर्व मास्क व ग्लोव्हज ताब्यात घेतले. हा उपक्रम असाच सुरू ठेवण्यात येणार असून, मोठ्या प्रमाणात मास्क व ग्लोव्हज उपलब्ध झाल्यास ते पुन्हा पालिका हॉस्पिटलला देण्यात येतील, अशी माहिती आयआयटी बॉम्बेकडून देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : दारुच्या नशेत त्यांनी केला थेट माजी मंत्र्यांनाच मेसेज अन्...
Coronavirus : 'मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही', मौलानांची 'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल
Coronavirus : चिंताजनक! भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी
Coronavirus : ...म्हणून 'त्या' जोडप्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'