- शेफाली परब-पंडीतमुंबई : मॅनेजमेंट गुरू म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या डबेवाल्यांनाही कोरोनाच्या परिणामांचा सामना करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालये, काही कार्यालये, दुकाने, मॉल्स बंद असल्याने डबे पोहोचविण्याच्या सेवेवर ५० टक्के परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यास ही सेवा काही काळ बंद ठेवण्याची वेळ डबेवाल्यांवर आली आहे.मुंबईतील शाळा, महाविद्यालये, शासकीय, खासगी कार्यालये, मॉल्स, दुकाने अशा निम्म्या चाकरमान्यांना घरचा डबा पोहोचविण्याचे काम डबेवाले करीत असतात. विरार ते चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या पट्ट्यातील घर, दुकान, कार्यालयात सुमारे पाच हजार डबेवाले दररोज जेवण पोहोचवितात.ऊन असो वा मुसळधार पाऊस, दुपारच्या जेवणाच्या वेळेआधी कार्यालयात डबा पोहोचविला जातो. त्यांच्या या वेळेच्या अचूक व्यवस्थापनामुळे डबेवाल्यांना जगभरात मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखले जाते. सद्यथितीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. तर कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती आहे.उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण डबेवाल्यांकडून येत असलेल्या डब्यांवर विसंबून आहेत. त्यामुळे डबेवाला नेहमीप्रमाणे डबे पोहोचविण्याचे काम करीत असले तरी कमी कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या सेवेवरही ५० टक्के परिणाम झाला आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करीत प्रवास करताना डबेवाल्यांच्याही आरोग्याला धोका आहे. त्यामुळे मुंबईत परिस्थिती आणखी बिघडल्यास डबासेवा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.डबेवाले अशी घेतात खबरदारीदररोज डबेवाल्यांच्या विश्वासावर निश्चिंत असलेल्या चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी डबेवालेही घेत आहेत. त्यामुळे दररोज मास्क लावणे, डबे पोहोचवित असताना हात स्वच्छ ठेवणे, जेवण वेळेत कार्यालयात पोहोचविणे आदी खबरदारी घेतली जात आहे.
Coronavirus : मुंबईतील ५० टक्के डबेसेवांवर परिणाम, प्रादुर्भाव वाढल्यास सेवा तात्पुरती होणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 4:34 AM